
न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना शालेपयोगी साहित्य वाटप
सत्यम फाउंडेशन, जत व एसएसडी ट्रस्टचा उपक्रम
आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन सत्यम फाउंडेशन जत यांच्या वतीने एस.एस.डी. ट्रस्टचे सामाजिक विकास केंद्र, शृंगारतळी (गुहागर) यांच्या सहकार्याने १५ सप्टेंबर रोजी केले होते. या कार्यक्रमाला सत्यम फाउंडेशनचे प्रा. गोविंद भास्करराव सानप, प्रा. अनिल शशिकांत हिरगोंड, प्रा. निळकंठ सखाराम भालेराव, प्रा. संतोष विठ्ठलराव जाधव, एसएसडी ट्रस्टचे संचालक माजी सैनिक मार्शल संतोष मोहिते, संचालिका डॉ. साक्षी मोहिते, सामाजिक विकास केंद्राचे अध्यक्ष मार्शल प्रमोद पवार, सदस्य मार्शल संतोष पवार, उत्तम पवार तसेच शाळेचे मुख्याध्यापक एम. ए. थरकार, ज्येष्ठ शिक्षक पी. व्ही. साळुंके, सहाय्यक शिक्षक पी. एम. केळस्कर, कलाशिक्षक एस. बी. कुळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. अमोल जड्याळ आदी उपस्थित होते.
यावेळी सर्वप्रथम मुख्याध्यापक श्री. थरकार यांच्या हस्ते पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर शाळेतील आठ विद्यार्थ्यांना शालेपयोगी साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी माजी सैनिक संतोष मोहिते यांनी सैनिक भारतीसंदर्भात मार्गदर्शन केले व शिक्षणाचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून विद्यार्थ्यांना पटवून दिले. प्रा. सानप यांनीही शिक्षणाच्या महत्त्वावर भाष्य केले. तसेच कोणत्याही विद्यार्थ्याला शिक्षणाबाबत अडचण निर्माण झाल्यास आम्ही त्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू, असे सांगितले.
तसेच प्रा. अमोल जड्याळ यांनी सत्यम फाउंडेशन जत व एसएसडी या सामाजिक विकास केंद्राने शैक्षणिक मदत देण्यासाठी ग्रामीण भागातील आमची शाळा निवडल्याबद्दल आभार मानले.
मुख्याध्यापक श्री. थरकार यांनी या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगती साधण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच भविष्यात हे विद्यार्थीही समाजासाठी कार्य करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक पी. व्ही. साळुंके यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन कला शिक्षक एस. बी. कुळे यांनी केले.




