विहिरीत पडलेल्या बिबट्याची वन विभागाकडून सुटका

रत्नागिरी : तालुक्यातील गणपतीपुळे येथील भगवती नगर रामरोड येथे ४० फूट खोल विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती वन विभागाला प्राप्त झाली. रेस्क्यू टीमने पिंजऱ्याच्या साह्याने अर्ध्या तासात बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळवले. या बिबट्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तो तंदुरुस्त असल्याची खात्री केली आणि त्याची नैसर्गिक अधिवासात मुक्तता केली.
याबाबत वन विभागाकडून मिळाली मी सविस्तर माहिती अशी, आज (२१ सप्टेंबर) १० वाजण्याच्या सुमारास गणपतीपुळे येथील भगवती नगर, रामरोड येथे भूषण जयसिंग घाग यांच्या मालकीच्या विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती भूषण घाग यांनी वनपाल (पाली) यांना दूरध्वनी वरून दिली. त्याप्रमाणे रत्नागिरीच्या परिक्षेत्र वन अधिकारी यांना याबाबतची माहिती तात्काळ देऊन रेस्क्यू टीम पिंजरा व साहित्यासह घटनास्थळी पोहोचली. या विहिरीला ३ फूट उंचीचा कठडा असून खोली ४० फुटांची आहे. ५ फुटावर पाण्याची पातळी असून ती घराच्या मागील बाजूस १०० फूट अंतरावर असल्याचे दिसून आले. विहिरीमध्ये पाहणी केली असता बिबट्या मोटर पाईपला व दोरीला धरून पाण्यावर असल्याचे दिसून आले. तात्काळ पिंजऱ्याला दोऱ्या बांधून पाण्याची खोली कमी असल्यामुळे सुरक्षेसाठी विहिरीवर जाळे टाकून पिंजरा विहिरीत सोडण्यात आला. अर्ध्या तासाच्या आतच बिबट्यास सुरक्षित पिंजऱ्यात जेरबंद केला.
मालगुंड (ता. रत्नागिरी) येथील पशुधन विकास अधिकारी स्वरूप काळे यांच्याकडून बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून घेतली. हा बिबट्या मादी जातीचा असून अंदाजे १० ते १२ महिन्यांचा आहे. ही कार्यवाही रत्नागिरी-चिपळूणच्या विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कामगिरीसाठी परिक्षेत्र वन अधिकारी (रत्नागिरी) प्रकाश सुतार, वनपाल (पाली) न्हानू गावडे, वनरक्षक (रत्नागिरी) विराज संसारे, वनरक्षक (जाकादेवी) श्रीमती शर्वरी कदम, किरण पाचारणे तसेच पोलीस अधिकारी श्री. ऐ. व्ही. गुरव, श्री. आर. एस. घोरपडे, श्री. ऐ. ऐ अंकार, श्री. एन. एस गुरव गावच्या सरपंच सौ. श्रेया राजवाडकर, गावचे पोलीस पाटील सुरज भुते, वन्य प्राणी मित्र महेश धोत्रे, ऋषिराज जोशी, रोहित खेडेकर, आदर्श मयेकर तसेच गावातील ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यासाठी वनाधिकारी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. हा बिबट्या सुस्थितीत असल्याने त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणी सापडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन रत्नागिरी-चिपळूणच्या विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button