
जयगड परिसरातील तिहेरी हत्याकांड प्रकरणात जयगड पोलिस ठाण्यातील आणखी एक पोलिस कर्मचारी अडचणीत
जयगड परिसरातील तिहेरी हत्याकांड प्रकरणात जयगड पोलिस ठाण्यातील आणखी एक पोलिस कर्मचारी अडचणीत सापडला आहे. बेपत्ता तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याच्या आरोपावरून हवालदार सोनावने यांना चौकशीनंतर निलंबित करण्यात आले असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
राकेश जंगम बेपत्ता प्रकरणात जयगड पोलिसांनी दाखवलेल्या हलगर्जीपणावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन दोषींवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर पहिल्या टप्प्यात कर्मचारी कुलदीप पाटील यांची बदली करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास अपर पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.




