
श्रद्धा कळंबटे, अमृता करंदीकर, मीनल ओक यांना स्वरूप योगिनी पुरस्कार
अध्यात्म मंदिरात २२ पासून स्वरूपानंद व्याख्यानमाला रंगणार पावसच्या स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे आयोजन
रत्नागिरी : पावस येथील स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे वरचीआळी येथील अध्यात्म मंदिरात स्वरूपानंद व्याख्यानमाला येत्या सोमवार दि. २२ सप्टेंबरपासून २४ सप्टेंबरपर्यंत तीन दिवस चालणार आहे. यामध्ये तीन व्याख्याने होणार असून या प्रसंगी स्वरूप योगिनी पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यंदा हा पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या सौ. श्रद्धा कळबंटे पर्यटन व्यावसायिक सौ. अमृता करंदीकर व चिपळूणच्या सौ. मीनल ओक यांना जाहीर झाला आहे.
२२ सप्टेंबरला स्वरूपानंद व्याख्यानमालेत ज्येष्ठ अभ्यासिका सौ. अंजली बर्वे या वेणा स्वामींचे चरित्र यावर व्याख्यान देणार आहेत. २३ सप्टेंबरला त्या मीराबाईंचे चरित्र उलगडून दाखवणार आहेत. २४ सप्टेंबरला श्रीकृष्णाचे व्यवस्थापन यावर सौ. मीनल ओक भगवान व्याख्यान देणार आहेत. २२ रोजी सौ. श्रद्धा कळंबटे, २३ ला सौ. अमृता करंदीकर आणि २४ रोजी सौ. मीनल ओक यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तीनही दिवशी कार्यक्रमाची वेळ सायंकाळी ५.४५ ते ७.१५ वाजेपर्यंत आहे.
रत्नागिरीतील श्रद्धा सुभाष कळंबटे या निवृत्त माध्यमिक शिक्षिका, समुपदेशक, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या आहेत. स्वयंसेतू या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी एड्स जनजागृती, स्त्री भ्रुणहत्या विरोधात प्रबोधन, नेत्रदान, देहदान प्रसार, मुलींच्या जन्माचे स्वागत असे अनेक उपक्रम राबवले. समाजातील निराधार, उपेक्षित, आर्थिक, दुर्बल घटकांच्या समस्या निवारणाचे कार्य करत आहेत. झोपडपट्टीतील महिलांचे सर्वप्रथम बचत गट स्थापन केले. ग्राहक प्रबोधन चळवळीत सहभाग, सामाजिक समस्यांवर ४०० चर्चासत्रे घेतली आहेत. कौटुंबिक सल्ला केंद्र चालवतात. यापूर्वी विविध संस्थांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
रत्नागिरीतील अमृता करंदीकर या अमृता टूर्स अँड ट्रॅव्हल्स या नावाने गेली २५ वर्ष देशांतर्गत व देशाबाहेर सहली आयोजित करत आहेत. आतापर्यंत १२०० सहली यशस्वीपणे आयोजित केल्या आहेत. पुणे, मुंबई येथील नामांकित प्रवासी कंपन्याप्रमाणेच करंदीकर यांनी आपल्या कंपनीचा ठसा उमटवला आहे. सेवाभावी वृत्ती, ज्येष्ठ नागरिकांबरोबर स्नेहभाव असल्यामुळे दिवसेंदिवस व्यवसायाची व्याप्ती वाढत आहे. कोकणातील पर्यटन वाढावे व्हावा म्हणून रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा छोटेखानी सहलीसुद्धा आयोजित करत आहेत. त्यांना स्वरूप योगिनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
चिपळूणच्या मीनल ओक यांनी कोंकण पर्यटन विकासातील आव्हाने यावर पीएचडी केली आहे. गेली २० वर्षे त्या कोकण पर्यटन विकासासाठी काम करणाऱ्या कोकण भूमी प्रतिष्ठानशी सलग्न आहेत. तसेच यापूर्वी डीबीजे कॉलेजमध्ये त्या प्राध्यापिका होत्या. विविध शैक्षणिक संस्थांमध्ये व्याख्यात्या म्हणून काम केले आहे. यापूर्वी शालेय, महाविद्यालयीन जीवनात जिल्ह्याची उत्तम महिला कबड्डीपटू तसेच अन्य विविध खेळांमध्येही राज्य पातळीवर चमकदार कामगिरी केली आहे. त्यांचा सन्मान स्वरूप योगिनी पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे.
व्याख्यान व पुरस्कार सन्मान सोहळ्याला रत्नागिरीकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाच्या अध्यक्षा शिल्पा पटवर्धन, कार्याध्यक्ष जयंत देसाई, कार्यवाह हृषिकेश पटवर्धन यांनी केले आहे.




