
शासकीय निमशासकीय व स्थानिक कंपन्या यांसकडून स्थानिक बेरोजगारांवर जर अन्याय होत असेल तर आता आम्ही गप्प बसणार नाही.-माजी सभापती शौकत मुकादम
शासकीय व निमशासकीय बेरोजगारांच्या भरतीमध्ये सतत कोकणावर अन्याय होत आहे, हे आता आम्ही किती दिवस सहन करणार. नुकतेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये १८० ग्रामसेवकांची नियुक्ती झाली. त्यामध्ये एकही रत्नागिरी जिल्हयातील बेरोजगाराला संधी मिळाली नाही. या भरतीसाठी अंदाजे पाच ते सहा हजार बेरोजगार (पदवीधर) इतक्या उमेदवारांनी परीक्षा दिल्या होत्या. मग जिल्ह्यातील व कोकणातील एकही बेरोजगार आमचा उमेदवार हुशार नाही का? असा प्रश्न माजी सभापती शौकत मुकादम यांनी उपस्थित केला आहे.
तसेच तलाठी, शिक्षक अन्य भरतीमध्येदेखील अशीच परिस्थिती दिसून येत आहे. तरी याची चौकशी व्हावी, अशी मागणी मुकादम यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले की, जिल्ह्यात येणाऱ्या कंपन्यामध्येही अशीच परिस्थिती दिसून येत आहे. एखादी कंपनी जिल्ह्यामध्ये आल्यानंतर त्याठिकाणी विविध राजकीय पक्षाचे लोक स्थानिक भरती व्हावी म्हणून कंपनीकडे आग्रह धरतात व न्याय मिळावा म्हणून आंदोलने केली जातात त्याच्यांवरही गुन्हे दाखल केले जात आहेत हे योग्य नाही. अशाच पद्धतीने शासकीय निमशासकीय व स्थानिक कंपन्या यांसकडून स्थानिक बेरोजगारांवर जर अन्याय होत असेल तर आता आम्ही गप्प बसणार नाही. कोकणातील सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरावे लागेल. कारण वरील प्रश्न आता अती झाला आहे तो आता आम्हाला सहन होणार नाही व आंदोलने केल्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा शौकत मुकादम यांनी दिला आहे.




