
रत्नागिरी जिल्ह्यात सजगतेचा इशारा
नेपाळमध्ये सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या जनआंदोलनाने राजकीय उलथापालथ घडवून आणली. प्रचंड संतापलेल्या जनतेने शासकीय इमारतींवर हल्ला करून तोडफफोड, जाळपोळ केली. या गोंधळाचा फायदा उठवत नेपाळातील सुमारे १३ हजार कैद्यांनी तुरुंग फोडून पलायन केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात नेपाळी कामगारांबाबत चौकशीचे व सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण जिल्ह्यातील आंबा उद्योग, मच्छीमार नौका, हॉटेल व्यवसाय, चायनीज सेंटर तसेच दगड-चिरे खाणींमध्ये मोठ्या प्रमाणावर नेपाळी नागरिक मजुरीसाठी येत असतात. त्यामुळे फरार कैदी आपली ओळख लपवण्यासाठी मजुरांच्या रुपात कोकणात येण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
व्यावसायिकांना कठोर सूचना पोलीस प्रशासनाने सर्व मच्छीमार बोट मालक, आंबा व्यावसायिक, हॉटेल चालक, चायनीज सेंटर मालक व चिरे खाणधारकांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत की, कोणत्याही नेपाळी नागरिकाला कामावर घेण्यापूर्वी त्याची संपूर्ण चौकशी व ओळख पडताळणी करणे आवश्यक आहे. प्रत्येक नेपाळी कामगाराची
माहिती, फोटोसह तपशील संकलित करून ती रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात जमा करणे बंधनकारक आहे. गावात येणार्या प्रत्येक नेपाळी नागरिकाची ’मैत्री ऍप’मध्ये १०० टक्के नोंदणी होणे अत्यावश्यक आहे. संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तातडीने पोलीस ठाण्यास कळवणे आवश्यक आहे, असे पोलिसांमार्फत कळवण्यात आले आहे
प्रशासनाने गावकर्यांनाही सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. गावात नवीन नेपाळी कामगार दिसल्यास त्याची वैयक्तिक भेट घेऊन चौकशी करा. संशय वाटल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्या. यामध्ये हलगर्जीपणा चालणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
नेपाळमधून पळून गेलेले कैदी गंभीर गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत होते. त्यातील काहीजण दहशतवाद, मारहाण, चोरी, दरोडे यासारख्या गुन्ह्यात सामील असल्याची भीती आहे. त्यामुळे त्यांचा जिल्ह्यात शिरकाव झाल्यास कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. नेपाळातील या उठावामुळे निर्माण झालेली परिस्थिती जिल्ह्यासह संपूर्ण कोकणासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. प्रशासनाने तातडीने सुरक्षा व्यवस्था वाढवून काटेकोर चौकशीचे आदेश दिले असून सर्व नागरिकांनीही जबाबदारीने सहभाग नोंदवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
www.konkantoday.com




