
माँ साहेबांच्या पुतळ्याची विटंबना म्हणजे मुंबई महापालिकेच्या राजकारणातून घडलेली घटना : आमदार भास्कर जाधव
“माँसाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे विद्रूपीकरण करण्याचा, विटंबना करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच वेळेला दादरसारख्या ठिकाणी सीसीटीव्ही नाही कॅमेरे नाही म्हणून तात्काळ आरोपी मिळत नाही, अशा पद्धतीने सरकारकडून जी वातावरण निर्मिती केली गेली त्याच वेळेला या प्रकरणातला संशय वाढला होता. आता आरोपी सापडला आणि मग नाव कुणाचे घ्यायचे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य उद्धव ठाकरे यांचे. ते कुणाच्याही प्रॉपर्टीच्या वादात कधी पडले असतील किंवा पडतील असे मला अजिबात वाटत नाही. ते प्रॉपर्टीच्या वादात पडले असते तर कुठेतरी त्यांच्या सभेमध्ये आरडाओरडा झाला असता, गोंधळ घातला असता किंवा तसा प्रयत्न झाला असता. माँ साहेबांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा त्यांचा तो प्रयत्न होता याचा अर्थ मुंबई महानगरपालिका राजकारण डोक्यावरून शिजले आणि त्यातून हे घडले असावे, असे मला वाटते,” अशी प्रतिक्रिया आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
भारतीय जनता पार्टीला पाकिस्तानचं नाव घेतल्याशिवाय झोपही लागत नाही, असे वक्तव्य करताना आमदार जाधव म्हणाले, “हे भाजपवाले जे कोणी असे बोलतात ते नुसते नालायक नाही, तर महानायक आहेत. त्यांनी खान म्हणायचे, कधी औरंगजेब म्हणायचे, भाजपवाल्यांचे हे प्रेम राष्ट्रप्रेम नाही, तर हे पाकिस्तान प्रेमी लोक आहेत. या देशांमध्ये पाकिस्तानचे नाव, मुसलमानांचे नाव, अतिरेक्यांचे नाव, धर्मविरोधी लोकांचे नाव, भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे संबंधित लोक जितके वेळेला घेतात, तितक्या वेळेला आमच्या भारतातले मुस्लिम सुद्धा घेत नाहीत; पण भारतीय जनता पार्टीला सकाळ – संध्याकाळ पाकिस्तानचे नाव घेतल्याशिवाय जेवणही गोड लागत नाही आणि झोपही लागत नाही. असे लोकच अशा पद्धतीची अश्लाघ्य भाषा करू शकतात, टीका टिपण्या करू शकतात कारण ते विकृत लोक आहेत.”
लाडक्या बहिणींमुळे राज्यावर कर्जाचा बोजा वाढला हे खोडून काढताना आमदार जाधव म्हणाले की, “लाडक्या बहिणींमुळे कर्जाचा डोंगर वाढलेला नाही, या मतावर मी ठाम आहे. सातत्याने लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे राज्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढला हे साफ खोटं आहे. विद्यमान सरकार आणि गेल्या अडीच वर्षातील ह्यांचेच सरकार यांच्या भ्रष्टाचारामुळे ते वाढले आहे. त्यांनी सरकारी तिजोरीवर मारलेल्या डल्ल्यामुळे ते वाढले आहे. सरकारी तिजोरीचे आपण विश्वस्त आहोत याचे भान ही त्यांना नाही. सरकारी तिजोरी लुटणारे आपण लुटारू आहोत अशा समजातून ज्यांनी अवैधरित्या, नियमबाह्य, चुकीची आणि भ्रष्टाचाराची कामे केली. त्यातूनच राज्य सरकारच्या डोक्यावर कर्ज वाढले. लाडक्या बहिणींच्या योजनेमुळे वगैरे काही नाही राज्याच्या डोक्यावर कर्ज वाढलेले नाही.”
निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आयोग किंवा कार्यकर्ता आयोग झाला आहे. सॉफ्टवेअरचा वापर करून मतदार यादीतून हजारो मतदार हटवण्यासाठी कर्नाटक साईटचा मोबाईल नंबर वापरला गेला, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, “उद्धव साहेब आणि देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी सातत्याने सांगतात, त्यांनी मागच्या वेळेला चौकीदाराबद्दल एक वक्तव्य केले होते. त्याच्यानंतर “वोट चोर, गद्धी छोड” आम्हाला संपूर्ण देशामध्ये घातलेला आहे. महाराष्ट्रात अवघ्या चार महिन्यांमध्ये ५५ ते ६० लाख मतदार कुठून वाढले आणि बिहार मधले ५० ते ५५ लाख मतदार कमी कसे करायचे याचा अर्थ प्रत्येक गोष्टीमध्ये चोरी. दुसऱ्यांचे पक्ष चोरणे, दुसऱ्याच्या निशाण्या चोरणे, दुसऱ्याचे आमदार, खासदार चोरणे आणि दुसऱ्या पक्षातील पदाधिकारी चोरणे. आता मत चोरी करणे हीच खऱ्या अर्थाने या लोकांची ओळख आहे आणि म्हणून राहुल गांधींनी हा लढा उभा केला आहे त्यातून हे स्पष्ट होते. निवडणूक आयोग हा भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी किंवा कार्यकर्ता आयोग झालेला आहे, अशी टीका आमदार भास्कर जाधव यांनी केली.
मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले की, “मराठा आरक्षणाबाबत ओबीसींचे मोर्चे निघाले त्याबद्दल मला काहीही मत नोंदवायचे नाही; परंतु कोकणामध्ये जे ओबीसी समाजाचे मोर्चे निघालेत. त्या मोर्चातून त्यांनी सरकारचा धिक्कार केला आहे, निषेध केला आहे. सरकारचा दुटप्पीपणा, सरकारची बदमाशी त्यांनी सर्वांच्या समोर आणून दिलेली आहे. कोकणातील आणि रत्नागिरी जिल्ह्यातील आणि विशेष करून माझ्या गुहागर मतदारसंघातल्या ओबीसी समाजाला सांगायचे आहे की गुहागर तालुक्यामध्ये एकाही मराठा समाजाच्या माणसांने मला कुणबी समाजाचे प्रमाणपत्र द्या अशा प्रकारची मागणी केलेली नाही. मागच्या वेळेला शोध केला गेला त्या वेळेला एकाच कोण तरी माणूस कुणबी समाजाचे त्याच्याकडे फार पूर्वीचे प्रमाणपत्र होतं अशा पद्धतीची महसूल विभागाकडे माहिती आली; परंतु तो माणूस सध्या पर्यंत कोण आहे तो महसूल विभागात काही दाखल झालेला नाही. त्यामुळे आपल्याकडे या गोष्टीचा कुठेही परिणाम नाही एवढा आपण सर्वांनी लक्षात घेऊ त्या संदर्भात मोर्चे, आंदोलने काढावी परंतु आपल्या इथे असलेल्या सामाजिक बैठकीला धक्का लागणार नाही, असे सर्वांनीच वागले पाहिजे.”




