
भारतीयांचं अमेरिकेत जाणं महागणार; H1 व्हिसा हवा असेल तर द्यावे लागणार ९० लाख; ट्रम्प यांचा निर्णय
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच१ बी व्हिसाबाबत मोठा निर्णय घेतलाय. यामुळे भारतीयांसह इतर देशातील अनेकांच्या अमेरिकेत नोकरीचं स्वप्न धुसर होण्याची शक्यता आहे. एच१ बी व्हिसासाठी आता १ लाख डॉलर म्हणजेच जवळपास ८० ते ९० लाख रुपये इतकं शुल्क भरावं लागणार आहे.ट्रम्प प्रशासनाचे म्हणणे आहे की, या निर्णयामुळे एच१ बी व्हिसाच्या सरसकट वापरावर मर्यादा येईल. कंपन्या अमेरिकन नागरिकांना प्राधान्य देण्याचा विचार करतील. या व्हिसामुळे तेव्हाच प्रवेश मिळेल जेव्हा निश्चित केलेलं शुल्क जमा केलं जाईल.
ट्रम्प यांनी म्हटलं की, आपल्याला चांगल्या कर्मचाऱ्यांची गरज आहे आणि कौशल्य असलेले कामगार यावेत यासाठीच हे पाऊल उचललंय. अमेरिकन कर्मचाऱ्यांनाच नियुक्त करण्यासाठी यामुळे प्रोत्साहन मिळेल. त्यासोबतच विशिष्ट क्षेत्रात उच्च कौशल्य असलेल्या परदेशी कामगारांसाठी मार्ग मोकळा असेल.




