
कोत्रेवाडीकरांचा प्रश्न अजूनही उत्तरांच्या प्रतीक्षेत !
कोत्रेवाडी येथील डम्पिंग ग्राऊंड प्रकल्पाच्या विरोधात गेले ३४ दिवस सुरु असलेल्या ग्रामस्थांच्या साखळी उपोषणाकडे प्रशासनाने अजूनही गांभीयनि पाहिलेले नाही. यावर संताप व्यक्त करत, ’पुढील दोन दिवसांत योग्य निर्णय न घेतल्यास प्रशासनाविरोधात अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल,’ असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व माजी खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे.
दि. १४ ऑगस्टपासून लांजा तहसील कार्यालयासमोर ग्रामस्थांचे उपोषण सुरू आहे. उपोषणाचा मंगळवार दि. १६ सप्टेंबर रोजी ३४ वा दिवस पूर्ण झाला. गणपतीसारख्या उत्सव काळातही ग्रामस्थांनी उपोषण थांबवले नाही. मात्र, एवढ्या दीर्घ काळानंतरही कोणत्याही प्रशासकीय अधिकार्याने उपोषणाची दखल न घेणे हे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.
’ग्रामस्थांचे हे शांततेत चाललेले आंदोलन प्रशासनाने दुर्लक्षित करणे गंभीर बाब आहे. इतक्या दिवसात एकदाही अधिकारी उपोषणस्थळी गेले नाहीत, हे खपवून घेतले जाणार नाही,’ असा रोखठोक इशारा त्यांनी दिला. यावेळी राऊत यांनी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून सद्यस्थितीची माहिती दिली. त्यावर जिल्हाधिकार्यांनी, ’या प्रकरणी दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई होईल. दोषींना अजिबात पाठीशी घातले जाणार नाही. फक्त २४ तासांची मुदत द्या, कारवाई नक्कीच होईल,’ असे आश्वासन दिले.www.konkantoday.com




