
जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धा
रत्नागिरी, खेड, चिपळूण, दापोली येथील शालेय सायकलपटूंचा वरचष्मा

रत्नागिरी : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी आणि रत्नागिरी जिल्हा सायकलिंग असोसिएशन यांच्या अंतर्गत जिल्हास्तरीय शालेय सायकलिंग स्पर्धा आज डेरवण येथील SVJCT क्रीडा संकुल येथे उत्साहात झाल्या. या स्पर्धेमध्ये खेड, चिपळूण, दापोली तसेच रत्नागिरीमधील सायकलपट्टूंनी यश संपादन केले.
१४ वर्षाखालील टाईम ट्रायल प्रकारात मुलांमध्ये रत्नागिरीच्या रुद्र जाधव याने प्रथम क्रमांक तर चिपळूणच्या मिथिल टाकळे याने द्वितीय क्रमांक पटकावला. १७ वर्षाखालील टाईम ट्रायल प्रकारात मुलांमध्ये दापोलीच्या वरद कदम याने प्रथम क्रमांक तर चिपळूणच्या ईशान वझे याने द्वितीय क्रमांक पटकावला.
१७ वर्षाखालील टाईम ट्रायल प्रकारात मुलींमध्ये रत्नागिरीच्या शमिका खानविलकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. १७ वर्षाखालील मास स्टार्ट प्रकारात आणि १४ वर्षाखालील मास स्टार्ट प्रकारात खेड येथील अनुक्रमे पियुष पवार व दिशांत पवार यांनी प्रथम क्रमांक पटकावला. वडील दीपक यशवंत पवार आणि खेड सायकलिंग क्लबचे मार्गदर्शन पियुष आणि दिशांत पवार यांना लाभले. रुद्र जाधव आणि शमिका खानविलकर यांना रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे फाउंडर मेंबर असलेल्या दर्शन जाधव आणि विनायक पावसकर यांचे मार्गदर्शन लाभले.
कोकणात सायकलिंगची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या श्रीनिवास आणि धनश्री गोखले यांचे मोलाचे मार्गदर्शन ईशान वझेला मिळाले. चिपळूण, खेड, दापोली, गुहागर, रत्नागिरी, देवरुख येथे मागील काही वर्षात सायकलिंग क्लब स्थापन झाले आहेत. ज्यामुळे जिल्ह्यातील सायकलिंग वृद्धिंगत झाले आहे. खेड सायकलिंग क्लब हा जिल्ह्यातील सर्वात जुना क्लब आहे. दापोली सायकलिंग क्लबची दापोली सायक्लोथॉन, चिपळूण सायकलिंग क्लबची किंग ऑफ कुंभार्ली, रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची रोलर कोस्टर सायक्लोथॉन या सायकल स्पर्धा सर्वदूर पोचल्या आहेत. दापोलीमधील अंबरीश गुरव तसेच मिलिंद खानविलकर, चिपळूण येथील आलेकर बंधू, खेड येथील विनायक वैद्य तसेच चिपळूण येथील श्रीनिवास व धनश्री गोखले यांचा नवीन सायकलिस्ट घडविण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. चिपळूण सायकलिंग क्लबच्या डॉ. मनीषा वाघमारे यांनी सायकलिंगच्या माध्यमातून नुकतीच गिनीज बुकला गवसणी घातली आहे. तसेच चिपळूणचे सायकलसम्राट प्रशांत दाभोळकर यांनी चालू वर्षात १० हजार किमी सायकलिंग पूर्ण केले आहे.
गेली २-३ वर्ष रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या माध्यमातून नियमित सायकल राईड चालू आहेत. तसेच सायकलविषयक अनेक उपक्रम चालू आहेत. यातून रूद्र आणि शमिकाला सायकलची गोडी निर्माण झाल्याचे रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या दर्शन जाधव आणि विनायक पावसकर यांनी सांगितले. त्यांना योग्य मार्गदर्शन करण्यात आले. तसेच मे महिन्यात रत्नागिरी सायकलिस्ट क्लबने शालेय विद्यार्थ्यांना संधी मिळण्यासाठी किड्स सायक्लोथॉनचे यशस्वीपणे आयोजन केले होते. यातून शालेय स्पर्धेसाठी खेळाडू तयार झाले, असे या वेळी रत्नागिरी सायकलिस्ट क्लबतर्फे सांगण्यात आले.
सायकलिंग स्पर्धेमध्ये खेळताना खेळाडूबरोबर चांगली सायकल देखील तितकीच महत्वाची असते. राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या माध्यमातून समाजातील कुशल आणि पात्र सायकलिस्टना वापरता यावी, म्हणून चांगली रेसर सायकल उपलब्ध करून दिली आणि ती देताना उदयोन्मुख खेळाडू ही सायकल वापरुदेत, असे सांगितले. रुद्र दर्शन जाधव याने हीच रेसर सायकल आजच्या शालेय जिल्हास्तरीय सायकलिंग स्पर्धेमध्ये वापरली आणि प्रथम क्रमांक मिळवला. त्यामुळे पालकमंत्री उदय सामंत यांनी कोकणातील सुप्रसिद्ध आणि सर्वांना एकत्र घेऊन जाण्याची इच्छा आणि क्षमता असलेल्या रत्नागिरी सायकलिस्ट क्लबची योग्य निवड या रेसर सायकलसाठी केली, यावर या निकालाने शिक्कामोर्तब झाले. उपस्थित सायकलप्रेमींनी सुद्धा रत्नागिरी सायकलिस्ट क्लबविषयी विचारणा केल्याचे आणि कुतूहल व्यक्त केल्याचं दर्शन जाधव आणि विनायक पावसकर यांनी सांगितले. सर्व शालेय सायकलपटूंचे जिल्ह्यातील सायकलप्रेमींनी विशेष अभिनंदन केले आहे.




