
कबुतरांच्या अभ्यासासाठी नेमण्यात आलेल्या समितीत डॉ.शहा, डॉ.अंधेरिया यांचा समावेश!
मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांवरील बंदीवरून जोरदार गदारोळ झाला होता. या पार्श्वभूमीवर मानवी आरोग्यावर कबुतरांमुळे होणाऱ्या परिणामांच्या संदर्भात अभ्यास करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली होती. या तज्ञ समितीत आता दोघा नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य सरकारने ही तज्ज्ञ समिती नियुक्ती केली आहे. या समितीत गुरुवारी आणखी दोन सदस्यांचा समावेश करण्यात आला.
या तज्ज्ञ समितीने केलेल्या शिफारशीवरून डॉ. अतुल शहा (विश्वस्त, श्री वर्धमान परिवार, मुंबई) आणि डॉ. अनीश अंधेरीया (अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, वन्यजीव संरक्षण न्यास, मुंबई) यांची ‘निमंत्रित सदस्य’ म्हणून समितीत समावेश करण्यात आला आहे.
या समितीची पहिली बैठक २९ ऑगस्ट रोजी झाली होती. त्यावेळीच या दोन तज्ज्ञांचा समावेश करण्याबाबत एकमताने शिफारस करण्यात आली होती. शासनाने ती मंजूर करून नियुक्ती जाहीर केली आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा पुणेचे संचालक डॉ. विजय कंदेवाड या समितीचे अध्यक्ष आहेत. समिती कबुतरांमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यधोक्यांचा अभ्यास करून योग्य शिफारसी सरकारला करणार आहे.