ओबीसी महामंडळाला प्रतीक्षा!

मुंबई : मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात खदखद आहे. एकीकडे ओबीसी समाजासाठीच्या सर्व योजना राबविण्यासाठी तसेच ओबीसी मंत्रालयाचा २९०० कोटींचा निधी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ओबीसी उपसमितीकडून जाहीर करण्यात आले आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्थापन करण्यात आलेल्या ओबीसींसाठीच्या महामंडळांवर अशासकीय सदस्यांची नेमणूकच झालेली नाही.

महायुती सरकारने गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध समाज घटकांना खूश करण्यासाठी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ या मुख्य कंपनीच्या अंतर्गत उपकंपनी म्हणून १५ महामंडळे स्थापन झाली. याशिवाय भटक्या जाती आणि विमुक्त जमातीच्या अंतर्गत सहा महामंडळे गठीत करण्यात आली आहेत. इतर मागासवर्ग आणि बहुजन कल्याण विकास खात्याचे मंत्री हे या सर्व महामंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष तर राज्यमंत्री उपाध्यक्ष आहेत. या महामंडळांवर प्रत्येकी तीन ते सहा अशासकीय सदस्य नेमण्याची तरतूद आहे. परंतु, शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या व्यतिरिक्त अन्य महामंडळांना अशासकीय सदस्यांची नेमणूकच झालेली नाही.

महायुतीतील घटक पक्षांत शासकीय महामंडळांचे वाटप झाले असले तरी राष्ट्रवादी (अजित पवार) वगळता भाजप तसेच शिवसेना शिंदे गटाने या महामंडळांवर अशासकीय सदस्यांची नेमणूक केलेली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या पक्षाच्या वाट्याला आलेल्या महामंडळांच्या संदर्भात निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. पवार यांच्या अखत्यारीतील वित्त आणि नियोजन खात्याने अलीकडेच परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देऊन सोयीसुविधा देण्याचा निर्णय घेतला. याशिवाय सोलापूर जिल्ह्यातील मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांची महाराष्ट्र राज्य सहकारी परिषद, पुणे अध्यक्षपदी वर्णी लावून त्यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला आहे. मात्र भाजपच्या अखत्यारित असलेल्या ओबीसी महामंडळांवर मात्र अशासकीय सदस्यांची नेमणूक झालेली नाही.

ओबीसींसाठी स्थापन करण्यात आलेली महामंडळे

महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ, जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ, संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ, श्री संत शिरोमणी नामदेव महाराज समस्त शिंपी समाज आर्थिक विकास महामंडळ, सोळा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ, स्व.विष्णूपंत रामचंद्र दादरे (लोणारी) आर्थिक विकास महामंडळ, संत श्री संताजी महाराज आर्थिक विकास महामंडळ, संत श्री. रुपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळ, संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ, लेवा पाटीदार समाज आर्थिक विकास महामंडळ, आगरी समाज आर्थिक विकास महामंडळ, सरदार वल्लभभाई पटेल गुजर समाज आर्थिक विकास महामंडळ, राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, कै. मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ, ब्रम्हलीन आचार्य दिव्यानंद गुरुजी आर्थिक विकास महामंडळ, श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ, विणकर समाज आर्थिक विकास महामंडळ, श्री शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button