
आनंद दिघे यांचे नाव घेण्याची राऊत यांची लायकी नाही-शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्याविषयी एक विधान केले असून यानंतर ठाणे जिल्ह्यात सर्वत्र संताप व्यक्त होऊ लागला आहे.त्यावर आता शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया देत राऊत यांना इशारा दिला आहे.
आनंद दिघे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वडिलस्थानी मानायचे आणि बाळासाहेब ठाकरे सुद्धा आनंद दिघे यांना आपला सगळ्यात लाडका शिष्य म्हणून मानायचे. असे असताना तू दिघे साहेबांची योग्यता काढतो. एक जिल्हाप्रमुख होते, अरे त्यांनी ठरवलं असत ना ते आमदारही झाले असते आणि खासदारही झाले असते आणि मंत्री झाले असते. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना नेते बनवले, आमदार बनवले आणि खासदार बनवले, तुझी योग्यता काय आहे, तू राहतो त्या ठिकाणी आतापर्यंत शिवसेनेचा नगरसेवक निवडून आणू शकला नाहीस, अशी टिका म्हस्के यांनी केली. आनंद दिघे यांचे नाव घेण्याची राऊत यांची लायकी नाही. त्यांची योग्यता काय आहे, असे म्हणत आनंद दिघे यांनी तुला कशा कशात वाचवलेला आहे हे लोकांसमोर आणू का, अशा शब्दात म्हस्के यांनी राऊत यांच्यावर टिका केली.मागच्या दाराने आमच्या आमदारांच्या जीवावर तू राज्यसभेचा खासदार झालास. धर्मवीर आनंद दिघे यांच्यावर टीका करायची, तुझी योग्यता आणि लायकी आहे का, तोंड सांभाळून बोल. तू आतापर्यंत दिघे यांचा नेहमी दुस्वास केला आहे. नेहमी त्यांना पाण्यात बघितल आहेस. तुझ्या एका मुलाखतीमुळे आमच्या दिघेंना टाडा लागलेला आहे, हे आम्ही विसरणार नाही. तोंड सांभाळून बोल, पुन्हा एकदा तुला मी इशारा देतोय. नाहीतर तुझी आम्हाला तुझी योग्यता, तुझी पात्रता आम्हाला दाखवावी लागेल, एवढे लक्षात ठेव, असा इशारा म्हस्के यांनी दिला.