अटल सेतूवर खड्डे! चित्रफितीनंतर एमएमआरडीएची नाचक्की!!

मुंबई : मोठा गाजावाजा करत वाहतूक सेवेत दाखल करण्यात आलेल्या आणि सुमारे १७ हजार कोटी रुपये खर्च करत बांधलेल्या अटल सेतूवर अवघ्या काही महिन्यांतच खड्डे पडले. नवी मुंबईच्या दिशेने तीन ठिकाणी मोठे खड्डे पडले असून ते बुजविण्याचे काम सध्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) सुरू आहे.

मात्र अवघ्या १८ महिन्यांमध्ये अटल सेतूवर मोठे खड्डे पडल्याने या प्रकल्पाच्या कामावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मुंबई ते नवी मुंबई अंतर केवळ १२ मिनिटांत पार करता यावे यासाठी २१.८ किमीचा अटल सेतू बांधण्यात आला. या अटल सेतूचे लोकार्पण १२ जानेवारी २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र लोकार्पणानंतर अवघ्या काही महिन्यांतच या अटल सेतूवर खड्डे पडले आहेत. यासंबंधीची एक चित्रफीत समाजमाध्यमावर फिरत आहे. यात खराब रस्त्याची दुरुस्ती करण्याचे काम सुरू असल्याचे दिसत आहे. यातून अटल सेतूच्या कामावर प्रश्न उपस्थित केला जात असून, एमएमआरडीएवर टीका होत आहे.

एमएमआरडीएने मात्र यावर अजब स्पष्टीकरण दिले आहे. अतिवृष्टीमुळे सेतूवरील पृष्ठभागाची दुरवस्था झाल्याचे उत्तर दिले . सध्या आवश्यक ती दुरुस्ती सुरू असून, पावसाळा संपल्यानंतर कायमस्वरूपी दुरुस्ती केली जाणार असल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात आले.

कंत्राटदाराला एक कोटींचा दंड

अटल सेतूवर खड्डे पडण्यासह रस्त्याच्या दुरवस्थेबाबत एमएमआरडीएने कंत्राटदारास एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. दोष दायित्व कालावधी एक वर्षाने वाढविण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button