
ॲल्युमिनिअम प्रकल्पाच्या जागेत घनकचरा प्रकल्प उभारू देणार नाहीरत्नागिरी ॲल्युमिनिअम प्रकल्प बाधित शेतकरी संघ
५३ वर्षांपूर्वी स्थानिक शेतकऱ्यांना रोजगाराचे आश्वासन देऊन कवडीमोल किंमतीने चंपक मैदानाजवळील जमीन ॲल्युमिनिअम प्रकल्पासाठी घेतली होती.त्या जमिनीवर आज पर्यंत साधा एक प्रकल्प सरकार उभारू शकले नाही.आता ती जमीन रत्नागिरी नगर परिषदेच्या घनकचरा प्रकल्पासाठी देण्याचा घाट रचला गेला आहे.त्या जमिनीवर घनकचरा प्रकल्प उभारू देणार नाही असा इशारा रत्नागिरी ॲल्युमिनिअम प्रकल्प बाधित शेतकरी संघाने देत आज रत्नागिरी नगर परिषदेवर धडक दिली.
रत्नागिरी नगर परिषदेचा घनकचरा प्रकल्प हा दांडेआडोम येथे होणार होता.तेथील ग्रामस्थांनी तीव्र विरोध केल्याने हा घनकचरा प्रकल्प रखडला.आता हा प्रकल्प चंपक मैदान येथील ॲल्युमिनिअम प्रकल्पासाठी घेतलेल्या जमिनीवर होणार आहे.या प्रकल्पासाठी पाच एकर जमीन घेण्यात येणार आहे.५३ वर्षांपूर्वी स्थानिक शेतकऱ्यांकडून सरकारने ९०० एकर जमीन ॲल्युमिनिअम प्रकल्पासाठी घेतली.त्यावेळी स्थानिक शेतकऱ्यांना रोजगाराचे आश्वासन दिले होते.
गेल्या ५३ वर्षांत या जमिनीवर एकही प्रकल्प उभा राहिला नाही त्यामुळे रोजगारही नाही आणि जमिनी गेल्याचे दुःख शेतकऱ्यांना भोगावे लागले.त्या सर्व जमिनी परत करा यामागणीसाठी गेली दोन वर्ष रत्नागिरी ॲल्युमिनिअम प्रकल्प बाधित शेतकरी संघ आंदोलन करत असताना अचानक हि जमीन रत्नागिरी नगर परिषदेच्या घनकचरा प्रकल्पाला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने शेतकरी संतापले आहेत.त्या जमिनीवर घनकचरा प्रकल्प उभारू देणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.आज रत्नागिरी ॲल्युमिनिअम प्रकल्प बाधित शेतकरी संघाने रत्नागिरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांना निवेदन दिले.यावेळी माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर,राजेंद्र आयरे,ॲड.अश्विनी आगाशे,उमेश खंडकर,विलास सावंत व इतर शेतकरी उपस्थित होते.