
रत्नागिरीत जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा उत्साहात संपन्न
रत्नागिरी: जिल्हा क्रीडा कार्यालय, रत्नागिरी आणि रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १५ सप्टेंबर रोजी शिवाजी स्टेडियम, रत्नागिरी येथे जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी क्रीडा अधिकारीगणेश जगताप , क्रीडा कार्यालयातील सुनिल कोळी व गणेश खैरमोडे, क्रीडा मार्गदर्शक सचिन मांडवकर, रत्नागिरी जिल्हा कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृष्ण उर्फ भाई विलणकर, डॉ.चंद्रशेखर केळकर, सदानंद जोशी, अमित विलणकर, संतोष कदम आणि आनंद तापेकर यांसारखे मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी खेळाडूंना प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तर मानसिंग कदम, मारूती गलांडे, योगेश हरचरेकर, वैभव चव्हाण, स्वप्निल घडशी आणि भावेश सावंत यांनी पंच म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली.
या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक युवा कुस्तीपटूंनी आपले कौशल्य दाखवले. डाव-प्रतिडावांनी रंगलेल्या या स्पर्धेत खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत उपस्थितांची मने जिंकली. या खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक सर्वच उपस्थितांनी केले. जिल्ह्यातील युवा कुस्तीपटूंना एक व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांना राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी तयार करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. या स्पर्धेतून निवडलेले खेळाडू लवकरच विभागिय स्पर्धांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा क्रीडा कार्यालय आणि कुस्ती असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच क्रिडा सहाय्यक दिनेश जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले. भविष्यातही अशा स्पर्धांचे आयोजन करून कुस्ती खेळाला जिल्ह्यात प्रोत्साहन देण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला.