
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली,
दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कजवळ बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व.मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. अज्ञातांनी या पुतळ्यावर लाल रंग फेकला, सकाळी ही गोष्ट शिवसैनिकांच्या निदर्शनास येताच एकच गर्दी झाली.राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी भेट देऊन पुतळ्याची पाहणी केली. पोलिसांनीही या प्रकाराची गंभीर दखल तात्काळ गुन्हा दाखल केला. या प्रकरणात पहिली अटक झाली असून, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने केलेल्या कृत्याची कबुली दिल्याचे सांगितले जात आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उपेंद्र पावसकर असे या व्यक्तीचे नाव आहे. ठाकरे गटातील कार्यकर्त्याचा हा चुलत भाऊ असल्याचे म्हटले जात आहे. श्रीधर पावसकर हा बाळासाहेब ठाकरे यांचा सुरक्षा रक्षक होता. काही कारणांमुळे त्याला काही वर्षांपूर्वी काढून टाकण्यात आले होते. श्रीधर पावसकर चा भाऊ गुणाजी पावसकर असून, या गुणाजी पावसकरचा मुलगा उपेंद्र पावसकर आहे. उपेंद्र पावसकर यानेच रंग टाकल्याचे सांगितले जात आहे.पोलिसांनी अटक केल्यानंतर सदर व्यक्तीने जबाबात धक्कादायक माहिती दिली. संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हस्तक्षेप करत असल्याचा आरोप या व्यक्तीने केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. यासंदर्भात मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत.




