
चिपळुणात १८ रोजी डॉक्टरांचे आंदोलन
राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषध द्रव्ये विभागाने सिसीएमपी कोर्स उत्तीर्ण केलेल्या डॉक्टरांना महाराष्ट्र मेडीकल कौन्सिलमध्ये नोंदणी करण्यास मान्यता दिली आहे.या निर्णयाला इंडियन मेडीकल असोसिएशनने तीव्र विरोध केला असून या निषेधार्थ चिपळुणात १८ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून २४ तास वैद्यकीय सेवा बंद आंदोलन पुकारले आहे. बंद कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवली जाणार असल्याची माहिती चिपळूण असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अब्बास जबले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले की, सीसीएमपी कोर्स उत्तीर्ण केलेल्या होमिओपॅथिक वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये नोंदणी करुन घेण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहे. हा निर्णय आरोग्य सेवा व्यवस्थेच्या सुरक्षिततेसाठी व गुणवत्तेसाठी गंभीर आहे. एमबीबीएस कोर्स साडेपाच वर्षांचा असून त्यात १९ विषयांचा परिपूर्ण अभ्यास, सखोल क्लिनिकल अनुभव, एक वर्षाची अनिवार्य इंटर्नशिप असते. असे असताना सीसीएमपी कोर्स केवळ १ वर्षाचा कोर्स आहे. आठवड्यातून २ दिवस तो शिकवला जातो. ज्यातून आधुनिक वैद्यकीय शास्त्रातील आवश्यक ज्ञान, कौशल्ये व निर्णयक्षमता विकसित होणे शक्य नाही. एमएमसी संस्था केवळ पूर्णपणे प्रशिक्षित व पात्र एमबीबीएस डॉक्टरांची नोंदणी करण्यासाठी आहे. सीसीएमपी डॉक्टरांची नोंदणी केल्यास दुहेरी प्रणाली निर्माण होऊन जनतेत गैरसमज व अविश्वास वाढेल. आधुनिक औषधोपचाराचा परवाना फक्त एमबीबीएस व नंतरच्या पात्रतेसाठी आहे सीसीएमपी फक्त ओरीएंटेशन स्वरुपाचा कोर्स असून, त्याद्वारे अलोपॅथीचे परवाने देणे अयोग्य आहे.




