प्रसिद्धी करावी, ती देवाभाऊसारखी! मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित पवारांचा टोला!

मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रशंसा करणारी देवाभाऊ ही जाहिरात गेल्या काही दिवसांपासून राजकारण्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत चर्चेला विषय ठरली आहे. ही जाहिरात कोणी दिली याचा विरोधक शोध घेत असतानाच मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीतही देवाभाऊच्या जाहिरातीचे पडसाद उमटले. प्रसिद्धी कशी करावी तर देवाभाऊसारखी असे म्हणत काही ज्येष्ठ मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे कौतुक केले.

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करीत असल्याची आणि त्यावर फक्त देवाभाऊ असा उल्लेख असलेली जाहिरात प्रसारमाध्यमांमध्ये तसेच राज्यभरातील जाहिरात फलकांवर प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीवरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करीत जाहिरातदाराचा शोध सुरू केला असतानाच मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीतही देवाभाऊंच्या जाहिरातीचे पडसाद उमटले. मुंबईला मनोरंजन व पर्यटन क्षेत्राची राजधानी बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकताना उद्योग विभागाने तयार केलेल्या ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी (एव्हीजीसी-एक्सआर) धोरणास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

उद्योग विभागाकडून मंत्रिमंडळासमोर या धोरणाचे सादरीकरण करण्यात आल्यानंतर त्यातील कल्पना आणि तरतुदी आणि योजनांचे मंत्रिमंडळाने तोंडभरून कौतुक केले. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे कौतुक करताना, या चांगल्या धोरणाची प्रसिद्धीही चांगली करा. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जाहिरात, करा असे सांगितले. जाहिरात कशी हवी, देवाभाऊसारखी असे पवार म्हणताच उपस्थित सभागृहात हंशा पिकला. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही होय अशीच जाहिरात व्हायला हवी. कोणी काही म्हणो प्रसिद्धी अशीच व्हायला हवी असे सांगत विषयावर पडदा टाकला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button