
नमो सेवा वर्ष साजरे करुन वेगळा आदर्श राज्यासमोर ठेवाकामासाठी येणाऱ्या नागरिकांची प्रतारणा होणार नाही, याची काळजी घ्या– पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी, दि.17 ) : लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वर्षभर ‘नमो सेवा वर्ष’ साजरे करुन महसूल विभागाने राज्यासमोर वेगळा आदर्श निर्माण करावा, अशी अपेक्षा पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त करतानाच, कामासाठी येणाऱ्या नागरिकांची प्रतारणा होणार नाही, त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी, याची काळजी घेण्याबाबतही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

जिल्हा नियोजन सभागृहात पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते महसूल विभाग सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने सेवा दूत ही सेवा घरपोच देण्याचा उपक्रम, ई-तक्रार निवारण प्रणाली आणि ई – संदर्भ पोर्टल या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कळ दाबून पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सामंत यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या मनपुर्वक शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ते म्हणाले, महसूल हे महत्वाचे खाते आहे. महाराष्ट्राच्या महसूल विभागांना हा सेवा पंधरवड्याचा उपक्रम आहे. परंतु, पालकमंत्री म्हणून मला आपल्याला सूचना करायची आहे की आपण हे वर्ष नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नमो सेवा वर्ष म्हणून साजरा करा. जिल्ह्यामधल्या नागरिकाला, ग्रामस्थाला पंधरा दिवस सुखी ठेवण्यापेक्षा वर्षाचे 365 दिवस जर आपण त्याला सुखी ठेवलं तर खऱ्या अर्थाने आपण शासनाला अपेक्षित असलेलं काम करतोय अशा पद्धतीचे चित्र एक वेगळा आदर्श म्हणून राज्यात जाईल.

कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांचे स्वागत हसत करावे. माझ्याबरोबर हसून बोलले, मला त्यांनी सन्मान दिला, मला त्यांनी आदर दिला, असा संदेश जनतेत गेला पाहिजे.

जर सन्मानाची वागणूक मिळाली नाही, तर तक्रारीची उत्पत्ती होते. जिल्ह्यातला अधिकारी किंवा महसूल अधिकारी भविष्यात कधीच नागरिकांची प्रतारणा होणार नाही, यासाठी काळजी घेईल. त्याला सन्मानाची वागणूक देईल. अधिकाऱ्यांनी माझं ऐकून घेतलं ही भावना नागरिकांसाठी महत्त्वाची आहे. जर नागरिकांचे ऐकून घेतलं नाही, तर त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण होतो. त्याची प्रचिती आपल्याला बघायला मिळते. प्रशासनाचे सगळे लोक अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रशासनाचा एक वेगळा दर्जा हा महाराष्ट्रामध्ये टिकलेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्राच्या शासनामध्ये रत्नागिरी जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांबद्दल चांगलं बोललं जातं.

खरं आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे, ही आमच्या सगळ्यांची भूमिका असते. पुढच्या वर्षभरामध्ये जो योग्य आहे, ज्यांनं चांगलं काम केलंय, त्याला शाब्बासकी देऊ आणि ज्यांना वाईट काम केलंय त्याच्यावर कारवाई करू. आपल्याकडे प्रकल्प येत आहेत. बेरोजगारी दूर करण्यासाठी हजारो लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्याच्यासाठी प्रशासनाने एक पाऊल पुढे जाऊन आपल्या 150 दिवसाच्या कार्यक्रमांमध्ये प्रकल्पाचे समर्थन करून शासनाची भूमिका त्यांना पटवली पाहिजे. लोटे परशुरामच्या परिसरामध्ये एखादा लेदर कंपनीचा कारखाना आणता आला, तर कारखान्याचे प्रोडक्शन सुरू होईपर्यंत प्रशासनाची जबाबदारी असते.
फ्लाईंग क्लबदेखील रत्नागिरीमध्ये
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, रत्नागिरीकरांच्या भाग्याचा क्षण एक सहा सात महिन्यानंतर येणार आहे. माझ्या शेतकरी कुटुंबातला मुलगा,मुलगी किंवा तिचे आई-बाबा 2000 रुपयांमध्ये विमानाने मुंबईला जातील. रत्नागिरीचे विमानतळ सुरु होणार आहे. ज्यावेळी एअरपोर्ट सुरू होईल तर माझा रत्नागिरीतला बांधव किंवा भगिनी पायलट जर तिला व्हायचं असेल तर मुंबईला जायची आवश्यकता नाही. त्यांच्यासाठी देखील फ्लाईंग क्लब रत्नागिरीमध्ये काढला जाईल. असे आश्वासन मी दिले होते. त्याची मूहर्तमेढ देखील मुंबईत रोवली.
प्रातांधिकारी जीवन देसाई यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिप प्रज्ज्वलन करण्यात आले. शिधा पत्रिका, वय अधिवास दाखला, रहिवास दाखला, जातीचा दाखला प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आले.
000




