
उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून १४ अवजड वाहनांवर कारवाई; ६० हजारांचा दंड वसूल
गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी जिल्ह्यात २२ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरदरम्यान विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. यासाठी कशेडी-चिपळूण, चिपळूण-रत्नागिरी आणि रत्नागिरी-राजापूर या तीन ठिकाणी दिवस-रात्र फिरती पथके तैनात होती.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे आणि सहायक प्रादेशिक अधिकारी अजित ताम्हणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पथके तीन शिफ्टमध्ये कार्यरत होती. महामार्गावरील अपघात, अडथळे किंवा वाहतुकीची समस्या तत्काळ दूर करण्यात येत होती.
यावर्षी गणेशभक्तांनी वाहतुकीचे नियम पाळल्याने मोठी कारवाई करण्याची वेळ आली नाही. मात्र, महामार्गावर बंदी असतानाही अवजड वाहतूक करणाऱ्या १४ वाहनांवर कारवाई करून एकूण ६० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.




