
स्थानिकांच्या सोबतीनेच रोजगार निर्मितीप्राचीन कोकण, मॅजिक गार्डननंतर ‘मैत्रेयी हँडीक्राफ्ट’
कोकण! जिथे नारळी पोफळीच्या बागा, काजू आंबा फणसाच्या रांगा अशा रांगांमधून होणारे सूर्यास्त दर्शन मनाला भुरळ घालते. निळ्याशार समुद्र, हिरव्यागार डोंगररांगा अशा या सौंदर्याने नटलेल्या कोकणात ‘इथे काम मिळत नाही..काम करायला माणसे मिळत नाहीत’ असा सर्वसाधारण संवाद ऐकायला मिळतो. पण, ही नकारात्मकता झुगारुन याच मातीतल्या माणसांच्या मेहनतीवर गणपतीपुळ्याच्या भूमीत वैभव सरदेसाई यांनी पर्यटनस्थळ उभारणीबरोबरच स्थानिकांच्या हाताला एक नवी कला दिली आहे. स्थानिक माणसांच्या सोबतीने किंबहुना त्यांच्या मेहनतीवरच प्राचीन कोकण, मॅजिक गार्डन या प्रकल्पानंतर लाकडी खेळणी बनविणारा ‘मैत्रेयी हॅडीक्राफ्ट’ हा प्रकल्प सुरु केला आहे.

प्राचीन कोकण- गणपतीपुळे मंदिरापासून अवघ्या काही अंतरावर अवघ्या तीन एकर जागेत 500 वर्षापूर्वीचे कोकण कसे होते हे जिवंत केले आहे. अगदी सुरुवातीलाच गुहेच्या आतमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सध्याचा कालखंड आणि गुहेतून पुढे प्रवास केल्यानंतर जुने कोकण अनुभवायला मिळते. येथील झाडांची सवर्णन करणारी पाटी केवळ माहिती देत नाही, तर त्या झाडासोबतच्या कोकणी नात्याची गोष्ट सांगते.


शंख आणि मोत्यांचे प्रदर्शन तसेच विक्री केंद्र अंदमानाचे दर्शन करुन जाते. याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी येथील युवती या गाईडची भूमिका निभावताना सविस्तर माहिती देत असतात. त्यांच्या माहितीतून कोकणी भूमीबद्दलचा आदर आणि प्रेम दिसून येतो. वर्षभरात दोन लाख पर्यटक येथे भेट देत असल्याचे श्री. सरदेसाई सांगतात. 2004 ला तीन एकरमध्ये हे त्यांनी साकारुन पर्यटन आणि कोकणमहती वाढविण्यावर भर दिली आहे. इथे भेट देणारे पर्यटक कोकणच्या समृध्द वारसाचा अनुभव घेतात.
मॅजिक गार्डन-विज्ञानाची जादुई दुनिया- प्राचीन कोकणच्या अगदी समोरच विज्ञानाच्या अद्भूत प्रयोगावर आधारित मॅजिक गार्डन बनविले आहे. या ठिकाणीही वर्षभरात जवळपास लाखभर पर्यटक भेट देत असतात. यात प्रामुख्याने शैक्षणिक सहली-विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग असतो. मिरर इमेजच्या गुहेत फिरताना वाट चुकल्यानंतरही मजा अनुभवायला मिळते. इन्फीनिटी हॉल, ओव्हरस्टेजटनेल, हॉरर हाऊस, थ्री डी थिएटर, विविध खेळ आणि जादूचे प्रयोग यामध्ये तास दीड तास कसा निघून जातो हे समजत नाही. खरंतर तीन एकर आंबा बागेतून वर्षाला एखादे पीक घेणे, तेही लहरी मान्सूनच्या जीवावर त्यातही रोगराई, त्याचा खर्च हे सगळे पाहून सरदेसाई यांनी नवा मार्ग स्वीकारला.

मैत्रेयी हॅडीक्राफ्ट’- आत्मनिर्भरतेचे शिल्प- दोन्ही प्रकल्प पर्यटनाला आकर्षित करीत असतानाच त्यांच्या यशानंतर सरदेसाई यांनी स्थानिक कर्मचारी तेही विशेषत: महिलांच्या मेहनतीवर ‘मैत्रेयी हॅडीक्राफ्ट’ हा नवा लाकडी खेळणी बनविण्याच्या प्रकल्पाची पायाभरणी केली.


चीन मधून येणाऱ्या घातक रंगाच्या खेळण्यांना पर्याय देताना अस्सल देशी उत्पादन त्यांनी यातून सुरु केले. शैक्षणिक खेळणी, की होल्डर्स, रायटिंग स्लेट, विशेष मुलांसाठीची खेळणी, फोल्डींग किल्ले, फुलीगोटीचा बालपणीचा खेळ अशा प्रकार खेळण्यांमधून कला, भाषा, बौध्दीक क्षमता याचे शिक्षण विकसित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. ही खेळणी केवळ वस्तू नसून तर ती कला, भाषा आणि बौध्दिक क्षमतेची बीजे रोवणारी साधने आहेत.
या उत्पादनांना सध्या विविध पर्यटनस्थळी विक्रीसाठी ठेवण्यात आले असून, त्यांना चांगली मागणीदेखील आहे. हरियाणामध्ये 45 हजार हत्ती 90 दिवसात द्यायचे होते. यासाठी स्थानिक कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेवून ते दिव्य पार पाडल्याचे सरदेसाई आर्वजून सांगतात. या कर्मचाऱ्यांमध्येही विशेषत: स्थानिक मुलीच आहेत. त्यांना पोशाख, प्रशिक्षण दिले आहे. स्थानिक रोजगाराबरोबर जोडीला सुरक्षितता आणि सन्मान दिल्यास मनुष्यबळाची कमतरता भासत नसल्याचे श्री. सरदेसाई विशेष उल्लेखाने सांगतात. यातूनच आज त्यांच्याकडे 82 कर्मचारी काम करीत आहेत.
कोकणात माणसे मिळत नाहीत हा संवाद आता भूतकाळात जमा होत आहे. स्थानिकांच्या सोबतीने आणि त्यांच्या परिश्रमावर कोणतीही स्वप्ने प्रत्यक्षात उतरवता येतात. हे यावरुन दिसून येते. युवकांनी याची प्रेरणा घेवून नव्या संकल्पना निर्माण केल्यास स्थानिकांच्या सहकार्याने नवे उद्योजक घडू शकतात हे या प्रकल्पावरुन दिसून येते.
– कुसुमानंद




