
लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेले फुणगूस आरोग्य केंद्रांतर्गतचे डिंगणी उपकेंद्र बंदावस्थेत
फुणगूस आरोग्य केंद्रांतर्गत येणारे आणि शासनाने लाखो रुपये खर्च करून डिंगणी गुरववाडी येथे बांधलेले उपकेंद्र बंद अवस्थेत पडले आहे. या उपकेंद्रासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त असूनही त्या फिरकत नसल्याने नागरिकांना उपचारासाठी खासगी दवाखान्यांकडे धाव घ्यावी लागत आहे. यामुळे गोरगरीब आणि शेतकरीवर्ग आर्थिकदृष्ट्या त्रस्त झाला आहे.
आरोग्य उपकेंद्रे ही ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा घरपोच पोहोचविण्यासाठी स्थापन केली जातात. प्रत्येक गावातील नागरिकांना आजारांपासून ते लसीकरण, गर्भवती स्त्रियांची काळजी, बालकांचे आरोग्य तपासणी, क्षयरोग नियंत्रण, स्वच्छता अभियान यांसारख्या अनेक सेवा उपकेंद्रांतून पुरवल्या जातात. परंतु येथील उपकेंद्रसाठी नियुक्त असलेली महिला कर्मचारी आठवड्यातून किंवा क्वचितच एक-दोन दिवस उपस्थिती दर्शवून निघून जातात. याचा अनेकदा लोकांना पत्ताच लागत नाही.
गावातील वाडीवस्तीवरील लोकांना गावच्या ठिकाणी उपचाराचे साधन उपलब्ध व्हावे म्हणून गावातील लोकांनी उपकेंद्र इमारत बांधण्यासाठी विना मोबदला जमीन दिली. मात्र त्याचा काहीही उपयोग येथील लोकांना होत नाही. उभारण्यात आलेल्या उपकेंद्राची इमारत सदैव कुलूप बंद असल्याने. रुग्णांवर प्राथमिक उपचारच होऊ शकत नसल्याने रुग्ण जनतेला आर्थिक पदरमोड करून तसेच वेळ खर्च करून डोंगर दर्यातून मार्ग काढत गावात कोणतेही खासगी औषधोपचाराचे साधन नसल्याने अनेक समस्यांचा सामना करत परगावातील किंवा तालुक्याच्या ठिकाणच्या दवाखान्यात धाव घ्यावी लागते.www.konkantoday.com




