
राजापूर तालुक्यात अनेक रस्ते खड्डेमय, रस्त्यांचे प्रश्न न सोडवल्यास घंटानाद आंदोलन करणार
राजापूर तालुक्यातील साखरी नाटे, नाटे, राजवाडी, आडिवरे, धाऊलवल्ली, देवाचे गोठणे, राजापूर बुरुंबेवाडी आदी मार्गावर पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले असून या भागातील काही मोर्या देखील खचल्या आहेत. या भागातील रस्ते आणि मोर्यांचे प्रश्न पुढील पंधरा दिवसाच्या आत न सुटल्यास तहसील कार्यालयासमोर टाळ मृदुंग घेऊन घंटानाद आंदोलन छेडण्यात येईल अशा आशयाचे निवेदन शिवणे खुर्द येथील युवा सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश जयंत मराठे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
काही गावात बस वाहतूक देखील बंद झाली आहे. या सगळ्याचा सामान्य लोकांना खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे. तालुक्यात मे महिन्यापासून सुरू झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे तालुक्यासह नाटे, साखरी नाटे, देवाचे गोठणे, आडिवरे भागात रस्त्यांच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे काही मार्गावरील गाड्या सुद्धा बंद झाल्या आहेत. प्रचंड खड्ड्यांमुळे अनेक छोटे मोठे अपघात होत आहे. व यामध्ये राजापूर धाउलवल्ली आंबेलकरवाडी मोरी कोसळल्याने बस वाहतूक बंद आहे. चार महिने होत आले तरी त्याच्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
देवाचे गोठणे येथे देखील मोरी कोसळली आहे. तिथे बॅरीकेडींग करण्यात आलेले नाही. काही ठिकाणी असलेल्या रस्त्याच्या बाजूला संरक्षक भिंती कोसळलेल्या आहेत.www.konkantoday.com




