
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा उद्या शुभारंभ
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत ग्रामसभेस उपस्थित राहण्याचे जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आवाहन
रत्नागिरी : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ उद्या (१७ सप्टेंबर) रोजी सकाळी १० वाजता मुख्यमंत्री यांच्यामार्फत करण्यात येणार असून, या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सर्व ग्रामपंचायतींमध्ये करण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत १७ सप्टेंबर रोजी सर्व ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या ग्रामसभेस मुख्यमंत्री यांच्यामार्फत मार्गदर्शन करण्यात येणार असून, ग्रामसभेमध्ये ग्रामस्तरीय समितीचे गठण करण्यात येणार आहे. या ग्रामसभेस विविध पुरस्कार प्राप्त व्यक्ती, ग्रामस्तरीय सर्व शासकीय, अशासकीय संस्थांचे कर्मचारी, प्रतिनिधी, सदस्य, महिला बचत गट, युवक मंडळे व भजनी मंडळे, माजी सैनिक, खेळाडू, कलाकार व साहित्यिक तसेच गावातील मान्यवरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे, यांनी केले आहे.
अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रम असा : सकाळी ८.४५ ते सकाळी ९ यावेळेत ग्रामसभा सदस्य व इतर मान्यवरांचे स्वागत, सकाळी ९ ते सकाळी ९.१० कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सकाळी ९.१० ते सकाळी ९.४० प्रवीण प्रशिक्षकांकडून अभियानाची सविस्तर माहिती, सकाळी ९.४० ते १० उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन, सकाळी १० वाजता मुख्यमंत्री यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या राज्यस्तरीय शुभारंभ कार्यक्रमाचा प्रारंभ.
हे अभियान १७ सप्टेंबरपासून ३१ डिसेंबर अखेर जिल्ह्यात राबविण्यात येणार असून, अभियानाचे सुशासन युक्त पंचायत, सक्षम पंचायत, जल समृद्ध, स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण करणे, गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण करणे, उपजीविका विकास व सामाजिक न्याय तसेच लोकसहभाग व श्रमदान माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे असे प्रमुख ७ घटक आहेत. या घटकांवर आधारीत विविध उपक्रमांकरीता पंचायत राज संस्थांचे १०० गुणांचे मूल्यमापन करण्यात येणार आहेत. सर्वाधिक गुण प्राप्त ग्रामपंचायतींची तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना शासनाच्या वतीने पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच विभागीय व राज्यस्तरीय पुरस्कार राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत. या योजनेंतर्गत दरवर्षी प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीस तालुकास्तरावर १५ लक्ष, १२ लक्ष व ८ लक्ष रुपये तसेच दोन ग्रामपंचायतींना उत्तेजनार्थ प्रत्येकी ५ लक्ष रुपये, जिल्हा स्तरावर ५० लक्ष रुपये, ३० लक्ष व २० लक्ष रुपये, विभाग स्तरावर १ कोटी रुपये , ८० लक्ष व ६० लक्ष रुपये आणि राज्य स्तरावर ५ कोटी रुपये, ३ कोटी व २ कोटी रुपये इतकी रक्कम देण्यात येणार आहे. तसेच पंचायत समित्यांना विभाग स्तरावर १ कोटी रुपये, ७५ लक्ष रुपये व ६० लक्ष रुपये, राज्य स्तरावर २ कोटी रुपये, १.५ कोटी रुपये व १.२५ कोटी रुपये आणि जिल्हा परिषदांना राज्य स्तरावर ५ कोटी रुपये, ३ कोटी रुपये व २ कोटी रुपये रक्कम देण्यात येणार आहे.
सर्व ग्रामस्थांनी या अभियानामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन “आपल गांव” ही संकल्पना मनात रुजवून, आपल्या ग्रामपंचायतीस मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पुरस्कार मिळवून देण्यासाठी मोलाची कामगिरी करावी असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रानडे यांनी केले आहे.