
स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियानांतर्गत महिलांची होणार आरोग्य तपासणी
१७ सप्टेंबर रोजी रत्नागिरी जिल्हा रुग्णालय व कामथे उपजिल्हा रुग्णालयात अभियानाचे जिल्हास्तरीय उद्घाटन
रत्नागिरी : केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान’ या विशेष अभियानांतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दरम्यान महिलांच्या आरोग्य तपासणीसह उपचार आणि आवश्यक समुपदेशन सेवा जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. १७ सप्टेंबर रोजी रत्नागिरी जिल्हा रुग्णालय व कामथे उपजिल्हा रुग्णालय येथे अभियानाचे जिल्हास्तरीय उद्घाटन होणार आहे.
ग्रामीण व शहरी भागातील महिलांना त्यांच्या आरोग्यविषयी शिक्षित करणे, जागरूक करणे आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.
या तपासणी व उपचारात स्तन व गर्भाशय कर्करोगाची प्राथमिक तपासणी, रक्तदाब व मधुमेहाची तपासणी, रक्तातील हिमोग्लोबिन तपासणी, असंसर्गजन्य आजार (एनसीडी) तपासणी, असुरक्षित महिलांसाठी क्षयरोग तपासणी, सामान्य आरोग्य समस्या यावर उपचार व समुपदेशन या सेवा समाविष्ट आहेत.
किशोरवयीन मुली व महिलांसाठी अशक्तपणा तपासणी, गर्भवती महिलांसाठी प्रसूतपूर्व काळजी तपासणी, गर्भधारणादरम्यान पोषण व काळजी समुपदेशन, माता-बाल संरक्षण कार्डचे वितरण,बालकांना लसीकरण सेवा, मासिक पाळी स्वच्छता व पोषण विषयक जनजागृती, रक्तदान मोहिम या विशेष सेवाही पुरविल्या जाणार आहे.
महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना नोंदणीसाठी आधारकार्ड, रेशनकार्ड व आधारला लिंक असणारा मोबाईल तसेच आयुष्मान वय वंदना कार्ड नोंदणीसाठी आधारकार्ड, आधारला लिंक असणारा मोबाईल असावा.
या अभियानांतर्गत रत्नागिरी जिल्हा रुग्णालय, ३ उपजिल्हा रुग्णालय, ९ ग्रामीण रुग्णालये, ६८ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ३७८ उपकेंद्रांमध्ये मोफत शिबिरे घेतली जाणार आहेत. यामुळे महिलांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास प्रोत्साहन मिळेल, गंभीर आजारांचे लवकर निदान होऊन योग्य वेळी उपचार सुरू करता येतील.
सर्व नागरिकांनी आपल्या घरातील सर्व महिला व मातांना या मोहिमेत सक्रीय सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित करून शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी केले आहे.