श्री क्षेत्र टेरव येथे भव्य नवरात्रौत्सवाचे आयोजन

चिपळूण : दसपटी विभागातील श्री क्षेत्र टेरव येथे भाविक व पर्यटकांचे आकर्षण ठरलेल्या तसेच महाराष्ट्र शासनाने यात्रस्थळाचा व पर्यटनाचा क दर्जा व तीर्थक्षेत्राचा ब दर्जा देवून गौरविलेल्या कुलस्वामिनी श्री भवानी वाघजाई मंदिरात सालाबादप्रमाणे या वर्षीही आदिशक्ती जगद्जननी श्री भवानी वाघजाई मातेचा नवरात्रौत्सव अश्विन शुद्ध प्रतिपदा (२२ सप्टेंबर) ते अश्विन शुद्ध नवमी (१ ऑक्टोबर) या कालावधीत पारंपरिक रूढी परंपरेप्रमाणे धार्मिक विधी व पूजन करून साजरा करण्यात येणार आहे.
नवरात्रौत्सवात श्री भवानी, वाघजाई, महालक्ष्मी, कालकाई व कुलस्वामीनी या देवींना वारानुसार नवरंगाच्या साड्या परिधान करून सोन्या-चांदीच्या मौल्यवान अलंकारांनी सालंकृत करण्यात येणार आहे. तसेच मंदिरास रोषणाई व आकर्षक फुलांची सजावट करून, पालखीत रूप लावण्यात येणार आहेत.
या मंदिरात भवानी मातेच्या ७.५ फूट उंचीच्या अत्यंत सुंदर व अप्रतिम कृष्णशीला मूर्तीसह गणपती, वाघजाई, भूमिगत कालकाई, महालक्ष्मी, कुलस्वामीनी, महादेवाची पिंडी, भैरी, केदार तसेच नवदुर्गा आदी देवतांची स्थापना करण्यात आली आहे. मंदिराचे खास आकर्षण म्हणजे श्री भवानी मातेबरोबरच शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धीदात्री या नवदुर्गांच्या मूर्ती सविस्तर माहितीसह स्थापित केलेल्या आहेत. भैरी-भवानी आणि नवदुर्गा असलेले महाराष्ट्रातील हे एकमेव देवस्थान आहे.
कोकणातील दाक्षिणात्य पद्धतीने बांधलेले हे मंदिर भाविक व पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. नागमोडी वळणाचा रस्ता, वनश्रीने नटलेले विस्तीर्ण पठार तसेच गोपुरांचे भव्यदिव्य मंदिर, आकर्षक मूर्ती, डोळ्यांचे पारणे फेडणारे सुंदर उद्यान, देवरहाटीतील हिरवीगार वनराई आणि गारवा यामुळे असंख्य भाविक व पर्यटक या देवस्थानाकडे आकर्षित होत आहेत. निसर्ग सौंदर्य लाभलेले श्री क्षेत्र टेरव येथील हे देवस्थान धार्मिक, अध्यात्मिक केंद्राबरोबरच एक पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होत आहे. जागृत, नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी, संकट विमोचक असा या देवीचा लौकिक आहे.
श्री क्षेत्र टेरव येथील भवानी -वाघजाई मातेच्या मंदिराबरोबरच चिपळूण येथील विंध्यवासिनी, परशुराम मंदिर, दसपटीची रामवरदायिनी, तुरंबव येथील शारदादेवी तसेच मार्लेश्वर मंदिर आदी मंदिराचे दर्शन भक्तगण व पर्यटक घेऊ शकतील.
नवरात्र उत्सव कालावधीत मंदिर दर्शनासाठी सदैव खुले राहणार असून ओटीचे सामान मंदिरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त टेरव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button