
पुण्यात ढगफुटी सदृश्य पावसाने घरे, गाड्या पाण्याखाली, आज शाळांना सुट्टी जाहीर; प्रशासनाचे नागरिकांना सर्कतेचे आवाहन!
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस सुरु असून, यामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. पुण्यातील हडपसर लोणी काळभोर परिसरात ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक घरे आणि गाड्या पाण्याखाली गेली आहेत. आज पुण्यातील अनेक भागांतील बहुतांश शाळांना सुट्टी देण्यात आली आहे, तर दुसरीकडे प्रशासनाने नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे, तर पुणे सोलापूर रोड लोणी आणि कदम वाकवस्ती या ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने अनेक गाड्या आणि काही घरे पाण्याखाली गेली आहेत. तर दुसरीकडे इंदापूर आणि बारामती तालुक्यातही मुसळधार पावसामुळे काही गावांत पाणी शिरल्याची माहिती समोर आली आहे.
थेऊरमध्ये 50 घरामध्ये पाणी शिरले असून घटनास्थळावर एनडीआरएफ चे पथक दाखल झाले आहे. रहिवाशांना रेस्क्यू करण्याचे काम सुरु आहे. पोलिसही घटनास्थळी पोहोचले असून नागरिकांना मदत पुरवली जात याशिवाय पुण्यातील पश्चिम भागातील धायरीमध्येही घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती समोर आली आहे.
खडकवासला’तून विसर्ग वाढविला
दरम्यान मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 4697 क्युसेक वाढवून सकाळी 08.00 वा. 7677क्यूसेक करण्यात येत आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. मुळा-मुठा नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचे प्रशासाकडून आवाहन करण्यात येत आहे.




