
ई पीक पाहणी शेतकरी स्तरावरील नोंदणीसाठी२० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ
रत्नागिरी, दि. 15 ) : खरीप हंगाम २०२५ साठी पिकांची नोंद “ई पीक पाहणी डीसीएस मोबाईल अॕप्लीकेशन” मध्ये ऑनलाईन पद्धतीने करण्याकरिता शेतकरी स्तरावरील कालावधी १ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर पर्यंत होता. सदर नोंदणीसाठी २० सप्टेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्यात काही ठिकाणी झालेली अतिवृष्टी, दुबार पेरणी या कारणामुळे शेतकरी पिकाची नोंद करण्यापासून वंचित राहू नये याकरिता ही मुदतवाढ देण्यात आली आहे, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी कळविले आहे.
ई-पीक पाहणी हा शासनाचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. ज्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांची माहिती स्वतः डिजिटल पद्धतीने नोंद करता येते. या प्रणालीमुळे पिकांची अचूक माहिती सरकारकडे जमा होते. ज्यामुळे शेतीविषयक योजना, पीक विमा योजना आणि इतर शासकीय अनुदानासाठी याचा उपयोग होतो.
पीक विमा योजनेत सहभाग, पीक कर्ज, शासकीय भात खरेदी-विक्री व शासनाच्या इतर योजनेकरिता ई पीक पाहणी करणे बंधनकारक असल्याने शेतकऱ्यांनी “ई पीक पाहणी डीसीएस मोबाईल अॕप्लीकेशन” मध्ये ऑनलाईन पद्धतीने पिकांची नोंद करावी.