
आमदार किरण सामंत यांनी ‘आमदार आपल्या दारी’ या संकल्पनेतून तालुक्यातील ग्रामीण भागात थेट ग्रामपंचायत स्तरावर भेटी देत विकासकामांचा घेतला आढावा
राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांनी ‘आमदार आपल्या दारी’ या संकल्पनेतून तालुक्यातील ग्रामीण भागात थेट ग्रामपंचायत स्तरावर भेटी देत विकासकामांचा आढावा घेतला. तब्बल ६० ग्रामपंचायतींना भेट देऊन आमदार सामंत यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत अपूर्ण प्रकल्प, नव्या गरजा आणि प्रलंबित प्रश्न ऐकून घेतले. या उपक्रमामुळे नागरिकांना आपल्या समस्या थेट आमदार आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी मिळाली.
२४ जुलै रोजी आंजणारी ग्रामपंचायतीत सुरू झालेला हा दौरा सलग दीड महिना चालून १० सप्टेंबर रोजी हर्चे ग्रामपंचायतीत संपला. आरोग्य, कृषी, पाणीपुरवठा, शिक्षण, पशुविकास, महावितरण, वनविभाग, परिवहन, महिला व बालकल्याण अशा विविध खात्यांचे अधिकारीही गावागावांत प्रत्यक्ष उपस्थित राहिले. त्यामुळे तक्रारींवर तात्काळ मार्गदर्शन व तोडगे मिळाले.
“गावोगावचा शाश्वत विकास हा माझा ध्यास आहे. नागरिकांच्या समस्या केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष कृतीत उतराव्यात यासाठीच आम्ही गाव पातळीवर आलो आहोत,” असे आमदार सामंत यांनी सांगितले. प्रशासनालाही प्रलंबित कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.