
अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा, प्रशासनाचा मोठा इशारा, पुढील 24 तास धोक्याचे..!
मुंबई : भारतीय हवामान विभागाच्या मोठ्या इशाऱ्यानंतर जोरदार पावसाला सुरूवात झालीये. मान्सून परतीच्या प्रवासावर असून पुढील दोन ते तीन दिवस अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने घाट विभागाला ऑरेंज अलर्ट जारी केलाय.
नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास पश्चिम राजस्थानमधून सुरू झाला आहे. यंदा तीन दिवस आधीच परतीचा प्रवास सुरू झाला आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्यातील चारही विभागात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जना आणि सोसाट्याच्या साऱ्यासह अतिजोरदार तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रात्रभर मुसळधार पाऊस सुरू होता. सकाळी अतिमुसळधार पाऊस मुंबईसह उपनगरांमध्ये सुरू झालाय.
कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, दहिसर, गोरेगाव, विलेपार्ले, सांताक्रूझसह मुंबई उपनगरातील अनेक भागात पाऊस सुरू झाला आहे. हवामान खात्यानेही पुढील काही तास अतिमुसळधार पावसाचे संकेत दिले आहेत. दादरमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून टॅक्सी, बससाठी प्रवाशांची मोठी झुंबड उडालीये. गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढला. सकाळपासून ढगाळ वातावरण, मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर कायम राहिल्यास सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, पुणे, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी केलाय. मराठवाड्यातीलही काही भागांमध्ये आज पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. कोकणात हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केलाय. मुंबईमध्ये रात्रभर पावसाची रिपरिप सुरूच आहे. मुंबईत सकाळी अतिमुसळधार पाऊस सुरू झाला आहे. विजांच्या कटकटाडासह पाऊस सुरू आहे.
पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर अधिक होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे सांगितले जात आहे. जालना जिल्ह्याला 3 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला. जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. नागरिकांना सतर्क राहून योग्य ती खबरदारी घेण्याच आवाहन करण्यात आलंय.
जालना जिल्हात मागील दोन दिवसापासून पूर्णतः ढगाळ वातावरण असून काल जिल्ह्याच्या अंबड तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावत मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं नुकसान केलं तर अनेक ठिकाणी नद्यांनाही मोठ्या प्रमाणात पूर आला. कुलाबा येथील प्रादेशिक हवामान केंद्राकडून जालना जिल्ह्याला पुढील 3 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला असून विजेच्या कडकडाटासह वादळी वारा यासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली असल्याने जिल्ह्यातील नागरिकांनी खबरदारी घेऊन सतर्क राहण्याचा आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं.




