वोट चोरीची चौकशी आमच्यापासून सुरू करा’, सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्लाबोल; भारत-पाक मॅच बद्दलही भाष्य!

नाशिक : नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर सुरू असून ज्येष्ठ नेते शरद पवारांसह अनेक नेते आमदार खासदार पदाधिकारी उपस्थित आहे. या शिबिरात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी विविध मुद्द्यांवर सरकारला धारेवर धरत, देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही भाष्य केले. यावेळी सुळे म्हणाल्या, “पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतरही भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना होतो, हे खूपच दुर्दैवी आहे. पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबांचे अश्रू अजूनही थांबलेले नाहीत. मी या सामन्याचा निषेध करते मी हा सामना पाहणार नाही आणि प्रत्येकाने ठरवावं’, असं म्हणत सुळे यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

राहुल गांधी आणि इंडिया आघाडी

राहुल गांधींच्या ‘मोहब्बत की दुकान’ या संकल्पनेचे सुळे यांनी कौतुक केलं. त्या म्हणाल्या, “राहुल गांधी जे बोलतायत, ते लोकांना पटायला लागलं आहे. आधी त्यांच्या व्हिडिओंना हजारो लाईक्स मिळायचे, आता मात्र करोडोंनी लाईक्स येत आहेत. हे दर्शवते की देशात बदल होत आहे. दिल्लीतही ते जाणवते. इंडिया आघाडीचे काम उत्तम सुरू आहे आणि देशात नक्कीच सत्तापरिवर्तन होईल’.

प्रवक्त्यांना महत्वाचा सल्ला

‘राज्यात सध्या पातळी सोडू टीका टिप्पणी सुरू आहे. मात्र कोणी कितीही पातळी सोडली तर आपण पातळी सोडू नका. कुणाच्या वैयक्तिक किंवा कुटुंबार टीका करू नका’ असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांना सूचना केल्या.

शेतकरी कर्जमाफीसाठी यही सही समय है

ऑपरेशन सिंदुरवेळी मी भाजपच्या लोकांना विचारलं पाकिस्तानसोबत चर्चा होणार की नाही. ते म्हणाले चर्चा होणार नाही उत्तर देणे का सही समय है, मी कालच देवा भाऊंना सांगितलं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी यही सही समय है.

‘नवे टॅलेंट पुढे येईल, कुणी गेल्याने फरक पडणार नाही’

अजित पवार गटावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत सुप्रिया सुळे म्हणाल्या, “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये टॅलेंटची कमतरता नाही. कुणीही पक्ष सोडून गेलं तरी त्यामुळे काहीही फरक पडणार नाही. नवे टॅलेंट नक्कीच पुढे येईल आणि ते पक्षाला आणखी मजबूत बनवतील.” त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, “ज्यांनी पक्ष सोडला त्यांची चौकशी अजूनही सुरूच आहे. त्यामुळे तुम्ही रुसवे-फुगवे दूर करा आणि लढण्याची तयारी ठेवा.

टेस्ला नाही मुलांना फक्त एसटी पाहिजे

राज्यातील अस्थिरतेवर बोलताना सुळे यांनी सरकारवर टीका केली. “महाराष्ट्रात काय चालले आहे हे समजत नाही. राज्यातील अस्थिरता दूर करण्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल. तुम्ही टेस्ला द्या, पण आमची मुले फक्त एसटीची मागणी करत आहेत. सरकारने गरिबांच्या गरजांकडे लक्ष द्यायला पाहिजे,” असे त्या म्हणाल्या.

‘मतदारांच्या जीवावर मी निवडून आले’

आपल्या विजयाचे श्रेय मतदारांना देताना त्या म्हणाल्या, “मी मतदारांच्या जीवावर निवडून आले आहे. कुठलाही नेता आमच्यासोबत नसतानाही आम्ही निवडून आलो. मतदार आणि कार्यकर्ता आमच्यासोबत होता, म्हणूनच हे शक्य झाले. बारामती माझ्यामागे उभी राहिली, त्यामुळेच मी जगात जाऊ शकले.” सुळे यांनी भाजपवर मतदान चोरीचाही आरोप केला. “शिरूर आणि बारामतीतून मतदान चोरीची चौकशी आमच्यापासून सुरू करा,” असे आव्हान त्यांनी दिले.
भारत पाक मॅच आणि वेगवेगळे उत्तर

सुप्रिया सुळे यांनी भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा निषेध नोंदवत मी हा सामना पाहणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली. मात्र, आज सकाळीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की हा एका दिवसाचा प्रश्न आहे खूप मोठा मुद्दा नाही, यानिमित्ताने दोन्ही बाप लेक यांच्या वक्तव्यात विरोधाभास दिसून आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button