
रत्नागिरी विभागातील एमआयडीसी पाईपलाईन पाणी घेणार्या उद्योजक व ग्राहकांना काही अज्ञात व्यक्तींकडून फसवणूक करणारे संदेश प्रसारित
रत्नागिरी विभागातील एमआयडीसी पाईपलाईन पाणी घेणार्या उद्योजक व ग्राहकांना काही अज्ञात व्यक्तींकडून फसवणूक करणारे संदेश प्रसारित केले जात असून त्यात बील भरण्यासंदर्भात चुकीची माहिती देत पाणी पुरवठा बंद करण्याची धमकी दिली जात आहे.ग्राहकांनी अशा धमक्या आणि माहितीबाबत एमआयडीसीच्या रत्नागिरी विभागाीय कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.
मागील तीन ते चार दिवसांपासून एमआयडीसीचे पाईपलाईनमधून पाणी घेणार्या ग्राहकांना पाणी बील भरा अन्यथा पाणीपुरवठा बंद करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. याबाबत काही ग्राहकांनी एमआयडीसीच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता, हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे अशा प्रकारचा कोणताही संदेश एमआयडीसीकडून प्रसारीत केला जात नसल्याचे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. उद्योजक व पाणी ग्राहकांनी फसवणूक करणार्या संदेशांना प्रतिसाद देऊ नये तसेच मेसेचवर येणार्या लिंकवरुन व्यवहार करु नयेत असेही आवाहन करण्यात आले आहे. अशा लिंकमुळे वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती चोरी होण्याची शक्यता आहे. पाणी बिलाबाबत कोणतीही शंका असल्यास तात्काळ एमआयडीसीच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन एमआयडीसीच्या कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.