
मनपा निवडणुकीपूर्वी मनसेला मोठा धक्का! प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’,
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) आगामी मनपा निवडणुकीपूर्वी मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी एका व्हिडीओद्वारे याबाबत माहिती दिली.यावेळी त्यांनी निर्णयामागील कारणेही स्पष्ट केली. पक्षात आपल्यावर अन्याय होत असून प्रत्येक बाबतीत आपल्याला डावलले जात असल्याचे त्यांनी सांगितलं . या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
प्रकाश महाजन यांनी व्हिडीओत आपली नाराजी व्यक्त करताना सांगितले, “गेल्या काही दिवसांपासून मला असे वाटत आहे की, मला आता थांबले पाहिजे. खरे तर, जेव्हा गंगेला बोल लावले गेले, तेव्हाच मला थांबायला हवे होते. पहलगाम येथील हल्ल्याच्या वेळीही मला थांबायला हवे होते. पण मला वाटले की, कदाचित परिस्थितीत सुधारणा होईल. त्यामुळे मी तेव्हा निर्णय घेतला नाही.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “मी कधीही वैयक्तिक इच्छा बाळगल्या नाहीत किंवा कोणत्याही पदाची अपेक्षा ठेवली नाही. माझी फक्त इच्छा होती की, हिंदुत्वाचा विचार जोपासला जावा. पण कमी अपेक्षा ठेवूनही मला खूप उपेक्षा सहन करावी लागली”, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
”मी कधीही निवडणुकीसाठी तिकीट मागितले नाही किंवा कोणतेही पद मागितले नाही. लोकसभा निवडणुकीसाठी मला विचारण्यात आले नाही. विधानसभा निवडणुकीतही मला केवळ प्रचारासाठी वापरले गेले. त्यामुळे मी आता थांबण्याचा निर्णय घेतला आहे.”असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान,गेल्या काही दिवसांपासून प्रकाश महाजन पक्षात नाराज असल्याच्या चर्चा होत्या. नारायण राणे यांच्याशी झालेल्या वादानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह पक्ष नेतृत्व त्यांच्यावर नाराज असल्याचेही बोलले जात होते. या काळात अमित ठाकरे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या सर्व प्रयत्नांना यश न मिळाल्याने अखेर प्रकाश महाजन यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला.




