
मंडणगड येथील शिगवण स्मशानभूमीत बेकायदेशीर टॉवर उभारण्याविरोधात तहसील कार्यालयात निवेदन
मंडणगड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत शिगवण यांच्या हद्दीमध्ये असलेले चक्रवर्ती सम्राट अशोक नगर व आदिवासी वाडी, शिगवण यांच्या पिढ्यानपिढ्या असलेल्या स्मशानभूमीत चुकीच्या पद्धतीने ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी ठराव मंजूर करून स्वतःची मनमानी करत बीएसएनएल टॉवर उभारण्यासाठी परवानग्या दिल्या आहेत. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला हरकत घेण्याकरिता पत्र दिले आहे व त्याच्या प्रती गटविकास अधिकारी, पंचायत समिती, मंडणगड यांच्याकडे दिल्या आहेत. तसेच या घटनेची चौकशी करण्यासाठी तहसीलदार, तहसील कार्यालय मंडणगड येथे वारंवार पत्रव्यवहार करून अद्याप शिगवण गावातील ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारचा न्याय मिळालेला नाही.
या घटनेची चौकशी करून येत्या १५ दिवसांच्या आत संबंधित असलेल्या ग्रामसेवक, सरपंच तसेच बीएसएनएल कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करावी. तसेच शिगवण स्मशानभूमीमध्ये हरकत असताना सुद्धा उभारण्यात आलेला टॉवर तत्काळ हटविण्यात यावा, असे निवेदन पत्र तहसील कार्यालयात देण्यात आले.
तसेच अनुसूचित जाती, जमाती व नवबौद्ध घटकांच्या भावनांशी खेळणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कार्यवाही न झाल्यास १५ ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयावरती अधिकाऱ्यांविरोधात आक्रोश मोर्चा काढण्यात येईल. तसेच या मोर्चाच्या वेळेस होणाऱ्या परिणामास संबंधित अधिकारी व प्रशासन जबाबदार राहील, असे या निवेदनात म्हटले आहे.
निवेदन सादर करताना अध्यक्ष अरविंद येलवे, भरत सरपरे, अभय पिचुर्ले, विश्वास सुगदरे, रजनिकांत धोत्रे, सचिन धोत्रे, मयुरेश धोत्रे आणि सिकंदर बुरूड आदी उपस्थित होते.