
भारतीयांचे रक्त आणि पाकिस्तानशी क्रिकेट सामने एकाचवेळी कसे? उद्धव ठाकरे यांचा सवाल! शिवसेनेचे आंदोलन
पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्याच्या जखमा भरल्या नसताना आणि शहीद जवानांचे रक्त सुकलेले नसताना पाकिस्तानशी क्रिकेट सामने कसे, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे केला. भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तानशी रविवारी होणारा क्रिकेट सामना रद्द करण्याची मागणी ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.
रक्त आणि पाणी एकाच वेळी वाहू शकत नाही, असे मोदी म्हणाले होते. त्यामुळे आता पाकिस्तान बरोबर होणाऱ्या क्रिकेट सामन्यावर बहिष्कार घालावा, असे ठाकरे यांनी नमूद केले. पाकिस्तान बरोबर होत असलेल्या क्रिकेट सामन्याला शिवसेनेचा विरोध असून ‘माझे कुंकू, माझा देश’, हे आंदोलन रविवारी केले जाणार आहे. पण, सामन्यावर बहिष्कार घालण्याची वेळ अजूनही गेलेली नाही, असे ठाकरे यांनी नमूद केले.




