
तिकीटची माहिती, ट्रेन लोकेशन, सुविधा. कोकण रेल्वेनं लाँच केलं ‘KR Mirror’ अॅप,
महाराष्ट्रातील रेल्वे वाहतुकीमध्ये कोकण रेल्वेचा मोठा वाटा आहे. दररोज हजारो प्रवासी या रेल्वेमार्गावरून प्रवास करतात. प्रवाशांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोकण रेल्वेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे.प्रवाशांच्या सोयीसाठी आणि माहितीच्या तत्काळ उपलब्धतेसाठी ‘केआर मिरर’ हे नवं मोबाईल ॲप नुकतंच लाँच करण्यात आलं आहे.
कोकण रेल्वे प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, या ॲपच्या मदतीनं प्रवाशांना रिअल टाईम माहितीपासून ते स्थानिक पर्यटन मार्गदर्शनापर्यंत सर्व काही एका क्लिकवर मिळणार आहे. सुरक्षाविषयक जागरूकता, सोपं नेव्हिगेशन आणि स्थानिक भाषांमधील माहिती या ॲपच्या खास वैशिष्ट्यांपैकी आहेत.केआर मिरर’ ॲपची वैशिष्ट्यं
ट्रेनचे रिअल टाईम रनिंग स्टेटस – कोणती ट्रेन कुठे आहे, वेळापत्रक आणि उशीराची माहिती त्वरित मिळेल.
स्टेशनवरील सुविधा – खानपान सेवा, प्रतीक्षालय, स्वच्छतागृह आदींचे तपशील.
महिलांसाठी स्वतंत्र सुविधा – सुरक्षा, हेल्पलाईन नंबर आणि विशेष माहिती.
पर्यटन मार्गदर्शन – कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे, चित्रपट चित्रीकरणाची ठिकाणं आणि फोटोंसह सविस्तर माहिती.
हेल्प डेस्क सुविधा – तक्रारी नोंदवणे आणि चौकशी करणे थेट ॲपवरून शक्य.
कोकण रेल्वेचा इतिहास – स्थापनेपासून आजवरचा प्रवास, महत्त्वाचे टप्पे आणि यशोगाथा.
सर्वांसाठी सुलभ डिझाईन – मोठ्या अक्षरांचा पर्याय, हाय कॉन्ट्रास्ट थीम आणि सोपं नेव्हिगेशन.
कोकण रेल्वेने सांगितलं की, या ॲपमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि माहितीपूर्ण होईल. स्थानिक भाषेत माहिती उपलब्ध असल्याने सर्व वयोगटांतील आणि विविध क्षमतांच्या प्रवाशांसाठी हे ॲप उपयुक्त ठरणार आहे.




