
चिपळूण स्थानकावर येणाऱ्या रेल्वे गाड्यांचे दरवाजे आतून बंद ,प्रशासनाने लक्ष द्यावे अन्यथा आम्हाला दरवाजे उघडावे लागतील,” शौकत मुकादम
चिपळूण स्थानकावर येणाऱ्या गाड्यांचे दरवाजे आतून बंद असल्याने आरक्षण तिकीट असणाऱ्या प्रवाशांनाही गाडीत प्रवेश मिळत नाही, अशी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. याविरोधात कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी आवाज उठवला आहे.
मुकादम यांनी सांगितले की, ३ सप्टेंबर रोजी दुपारी मांडवी एक्सप्रेस चिपळूण स्थानकावर आली असता दरवाजे आतून बंद होते. त्यामुळे आरक्षण केलेले प्रवासी बाहेरच राहिले. प्रवाशांनी याबाबत आरपीएफ पोलिसांकडे तक्रार केली असता त्यांनी बघ्याची भूमिका घेतली, असा आरोप त्यांनी केला.
“आरक्षण केलेल्या प्रवाशांचे पैसे वाया जात आहेत. रेल्वे प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष घालावे, अन्यथा आम्हाला दरवाजे उघडावे लागतील,” असा इशारा मुकादम यांनी दिला.
स्थानिक प्रवाशांमध्ये या प्रकारामुळे संताप व्यक्त होत असून, रेल्वे प्रशासनाने दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.




