
राजकीय रंग न देता जर आपण सेवाभाव जपला, तर या संस्था समाजप्रबोधनाचं मोठं कार्य करू शकतात- पालकमंत्री उदय सामंत
शिव स्वराज्य फाउंडेशन तर्फे आयोजित सेवाभावी संस्था प्रबोधन समितीच्या उद्घाटन सोहळ्याला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत उपस्थित होते. रत्नागिरी ही अशी भूमी आहे की इथे सुरू झालेलं कोणतंही कार्य अर्धवट राहत नाही. सेवाभावी संस्था या नावालाच ‘सेवाभाव’आहे. राजकीय रंग न देता जर आपण सेवाभाव जपला, तर या संस्था समाजप्रबोधनाचं मोठं कार्य करू शकतात असं वक्तव्य यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी केलं
सेवाभावी संस्था म्हणजे समाजहितासाठी निरपेक्ष भावनेनं काम करणं. या संस्था पक्षविरहित राहून समाजाला दिशा देतात तेव्हाच त्यांचं कार्य खऱ्या अर्थानं प्रभावी ठरतं. समाजामध्ये निर्माण होणारे गैरसमज, अन्याय किंवा राजकीय उपयोगासाठी होणारी चळवळ यावर प्रकाश टाकण्याची ताकद सेवाभावी संस्थांकडे असल्याचं मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी सांगितले.
आज या कार्यक्रमात वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते एकत्र आलेले पाहून समाधान वाटलं. हीच खरी ताकद आहे – समाजहितासाठी सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची. माझं राजकारण हे देखील सेवाभावी संस्थेतून सुरू झालं. समाजकारणातून मिळालेलं जनतेचं प्रेम आणि विश्वास आजही मला पुढे जाण्याची ताकद देतं. या संस्थेला पुढील कार्यासाठी माझ्या शुभेच्छा! रत्नागिरी जिल्ह्यात शासनस्तरावर आवश्यक ते सर्व सहकार्य दिलं जाईल, याची खात्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी या कार्यक्रमानिमित्त दिली.
या प्रसंगी विनायकराव पाटील, सुरेशजी गजरेकर, संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सुनीता ताई मोडक, सुजाताताई ढेरे, बाळाभाऊ फाटक, डॉ. जगताप, समीरजी गारे, राजूजी भाटलेकर, अनिताताई, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख शिल्पाताई सुर्वे आदी मान्यवर,पदाधिकारी, बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.