
रत्नागिरीतील राज्य उत्पादन शुल्क विभागासाठी ३३ निवासस्थानांना गृहविभागाकडून मंजुरी
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांसाठी रत्नागिरीत नवीन निवासस्थाने बांधण्यास गृह विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या महत्वपूर्ण प्रकल्पासाठी तब्बल १४ कोटी ७५ लाख १२ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.
हा प्रकल्प रत्नागिरी शहरातील झाडगांव येथे साकारला जाणार असून यासाठी सर्व्हेक्षण क्रमांक २४८ हिस्सा क्र. १ आणि नगर भूमापन क्रमांक २८७९ (प.) येथील शासकीय जमीन निश्चित करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण ३३ निवासस्थाने बांधली जातील, जी विविध प्रकारांमध्ये विभागली जातील. त्यात दोन इमारतींमध्ये २० निवासस्थाने (प्रकार-१), एका इमारतीत १२ निवास्थाने (प्रकार-२) आणि तळमजला असलेले एक निवासस्थान (प्रकार-४) यांचा समावेश असेल. ही सर्व निवासस्थाने तळमजला अधिक तीन मजले (+३) असलेल्या रचनेत बांधली जातील.
एकूण खर्चात फक्त इमारतींचे बांधकामच नाही, तर पाणीपुरवठा, सांडपाणी प्रक्रिया अंतर्गत व बाह्य विद्युतीकरण, अग्निशमन सुविधा, कंपाऊंड वॉल, अंतर्गत रस्ते, पार्किंग, लँडस्केपिंग, माती परीक्षण आणि गटार बांधकाम यासारख्या पायाभूत सुविधा देखील समाविष्ट आहेत.
www.konkantoday.com