
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेची सांगता
पीडित महिलांच्या मदतीसाठी कक्ष सुरू करणार शिल्पाताई पटवर्धन
रत्नागिरी : महिलांच्या सक्षमीकरणासाठी महिलांनी पुढे आले पाहिजे. तसेच समाजातील बंधूवर्गसुद्धा मदतीला असतो. परिषदेमध्ये विविध महिलांच्या विविध प्रश्नांवर चर्चा झाली. त्याप्रमाणे आता समाजातील समस्याग्रस्त, पिडीत महिलांच्या मदतीसाठी महिला कक्ष तयार करूया, त्याकरिता महिला प्राध्यापकांनी वेळ द्यावा. चाकोरीबाहेरचे काम करता येईल. खांद्याला खांदा लावून काम केले तर अवघड नाही. ही या परिषदेची फलश्रुती असेल, असे प्रतिपादन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन यांनी शनिवारी सायंकाळी केले.
गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातर्फे आयोजित ‘महिलांच्या शाश्वत विकासासाठी शिक्षण, समानता आणि सक्षमीकरण’ आंतरराष्ट्रीय परिषदेच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागाच्या प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान योजनेअंतर्गत गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाला प्राप्त अनुदानाअंतर्गत महाविद्यालयातील महिला विकास कक्षाच्या वतीने विवा एक्झिक्यूटीव्ह ही परिषद झाली.
या वेळी मंचावर स्त्री प्रश्न, स्त्रीवादाच्या अभ्यासक आणि चळवळीतील कार्यकर्त्या आणि दिलासा संस्थेच्या प्रमुख प्रा. डॉ. रुपा शहा, प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, पीएम-उषा महाविद्यालयीन समन्वयक व शास्त्र शाखा उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, उपप्राचार्या प्रा. डॉ. कल्पना आठल्ये व प्रा. डॉ. सीमा कदम, महिला विकास कक्ष आणि परिषदेच्या समन्वयक डॉ. सोनाली कदम, आयोजन सचिव प्रा. अश्विनी देवस्थळी उपस्थित होत्या. याप्रसंगी सहभागींनी प्रातिनिधीक मनोगत व्यक्त करून अशा प्रकारे वारंवार परिषदा व्हाव्यात आणि यातून बरेच काही शिकायला मिळाल्याचे सांगितले. डॉ. साखळकर यांनी अध्यक्षीय भाषणामध्ये नारीशक्तीचा सन्मान केला. सर्वाधिक विद्यार्थीनी महाविद्यालयात असून महिला प्राध्यापकही जास्त असल्याचे आवर्जून सांगितले. तसेच तीनही शाखांच्या उपप्राचार्यपदी महिला विराजमान असून रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीत महिला-पुरुष भेद नसल्याचे सांगितले.
याप्रसंगी ऑनलाइन माध्यमातून या परिषदेत सहभागी झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या उपकुलसचिव डॉ. योगिनी घारे यांनी सांगितले की, शाश्वत विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून, शिक्षण, समता आणि सबलीकरण हे केवळ स्त्रियांसाठीच नव्हे तर सर्वांसाठी उपयुक्त आहे. समाजात स्त्रियांना अनेक ठिकाणी संघर्ष करावा लागला असून, वर्षानुवर्षे जी स्वातंत्र्य – समतेची बंद असलेली कवाडे खुली करून देण्यात समाजसुधारकांचे खूप मोठे योगदान आहे. स्त्रीने सामाजिक भान जपावे. बदलत्या काळानुरूप आपली मानसिकता बदलावी. विकास प्रक्रियेतून स्त्रियांना वगळणे म्हणजे विकासाच्या प्रक्रियेस खिळ घालण्यासारखे आहे.
याप्रसंगी प्रातिनिधीक सहभागींना प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच चर्चासत्राच्या प्रमुख डॉ. यास्मिन आवटे यांचा सत्कार करण्यात आला. महिला शक्ती म्हणून शिल्पाताई पटवर्धन यांनाही शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. मेघना म्हाद्ये यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अश्विनी देवस्थळी यांनी आभार मानले.




