
खेडशी परिसरात डफळचोळवाडी येथे गव्यांचा धुडगूस
रत्नागिरी शहरालगत असलेल्या खेडशी गावातील डफळचोळवाडी परिसरात गव्यांच्या (रेड्यांच्या) वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी व ग्रामस्थ हैराण झाले आहेत. गेल्या महिन्याभरापासून हे गवे रात्री-अपरात्री शेतात घुसून भातशेती व फळबागांचे मोठे नुकसान करत आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
विशेषतः धक्कादायक बाब म्हणजे दिवसाढवळ्या या गव्यांचा कळप गजबजलेल्या वस्तीजवळ फिरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नव्याने लागवड केलेल्या पिकांचे आणि बागांचे नुकसान झाल्याने शेतकर्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला आहे. खेडशी गावातील शेतकरी विश्वास खापरे यांच्या भातशेतीचे या गव्यानी अतोनात नुकसान केले आहे. खेडशी चांदसूर्या ते पानवल फाटा या भागात गव्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. बुधवार १० सप्टेंबर रोजी या गव्यांच्या कळपांचे दर्शन या भागात मिर्या-नागपूर महामार्गालगत परिसरातील रहिवासी, महामार्गावरून ये-जा करणार्या वाहनधारकांना घडले. अनेकांनी त्या गव्यांची छायाचित्रे, व्हिडीओ चित्रिकरणही केले. ते गवे त्या भागात खुलेआम ठाण मांडून राहिलेले दिसून आले.
www.konkantoday.com




