
कर्नाटकात गणेश विसर्जन मिरवणुकीत भरधाव ट्रक घुसला; 8 जणांचा मृत्यू, 25 गंभीर जखमी!
कर्नाटकमधील हासन जिल्ह्यामध्ये भीषण अपघात झाला आहे. शुक्रवारी गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना भरधाव ट्रक गर्दीत घुसला. एनएच-373 वर झालेल्या या अपघातामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला, तर 25 हून अधिक जखमी झाले आहेत.
कर्नाटकातील हासन जिल्ह्यामध्ये भरधाव ट्रक गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला आणि 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुचाकीस्वाराला वाचवताना हा अपघात झाल्याची माहिती मिळतेय.
या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झाले आहेत. जखमींवर केआरएमएस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी एकाची प्रकृती गंभीर असून त्याला पुढील उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस अपघातामागील कारणांचा तपास करत आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ट्रक आधी डिव्हायडरला धडकला आणि त्यानंतर गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला. या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये इंजिनियरिंगचे विद्यार्थी सहभागी झाले होते अशीही प्राथमिक माहिती मिळतेय. पोलीस पुढील तपास करत आहेत, अशी माहिती हासन जिल्ह्याच्या उपायुक्त केएस लता कुमारी यांनी दिली.




