
अणुउर्जा प्रकल्पाच्या अधिकार्यांकडून जैतापुरातील मर्जीतील ठेकेदार आणि सोसायट्यांना कामे बहाल
जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाची उभारणी करून स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांनाच काम देवून आर्थिक सक्षम करणार असा बागुलबुवा उभा करणार्या अणुउर्जा प्रकल्पाच्या अधिकार्यांनी स्थानिक स्तरावर विरोध मावळताच आपल्याच मर्जीतील ठेकेदार आणि सोसायट्यांना कामे बहाल केल्याने स्थानिक रोजगाराला थांबा मिळत आहे. राजापुरातील बेरोजगारांनी स्थापन केलेल्या तब्बल ६० पेक्षा जास्त सहकारी संस्था, सोसायट्या अवसायनात गेल्या असून बंद झाल्या आहेत.
राजापूर तालुक्यातील जैतापूर परिसरातील माडबन येथे सुमारे साडेनऊशे हेक्टर जमिनीवर तब्बल दहा हजार मेगावॅट प्रकल्प उभारण्याचे केंद्र शासनाने जाहीर केले. या प्रकल्पाची कामे सुरू होताच स्थानिक स्तरावर या प्रकल्पाला तीव्र विरोध झाला. त्यानंतर हा विरोध कमी करण्यासाठी प्रकल्प अधिकार्यांनी प्रकल्पापूर्वीची कामे स्थानिकांना देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. तसे पत्रकच पुस्तकाच्या स्वरूपात वाटप करण्यात आले. कामे मिळणार या आशेने येथील बेरोजगारांनी तब्बल ६० पेक्षा जास्त सहकारी संस्था स्थापन केल्या. प्रचंड विरोध असताना हा विरोध कमी करण्यासाठी प्रकल्प अधिकार्यांनी ही कामे स्थानिक सोसायट्यांना देणे सुरू केले. त्याप्रमाणे अणुउर्जा प्रकल्पाच्या रत्नागिरी कार्यालयाला वाहने पुरवणे, सिक्युरिटी गार्ड पुरविणे, झाडे लावणे, प्रकल्प स्थानावर कॅन्टीन चालवणे, झाडांना पाणी शिंपणे, प्रकल्प स्थळावरील गवत कापणे अशी छोटी मोठी कामे कोणतीही टेंडर न काढता सोसायट्यांना बहाल करण्यात आली.
मात्र स्थानिक स्तरावर हळुहळू विरोध कमी झाल्यावर या अधिकार्यांनी आपले दात दाखवायला सुरूवात केली. वेगवेगळी कारणे आणि कायदे दाखवून ही कामे स्थानिक सहकारी संस्थांकडून काढण्यात आली. दिल्ली, पुणे सारख्या मोठ्या शहरातून धनाढ्य सहकारी संस्थांना हीच काम देण्याची सुरूवात झाली. माजी सैनिकांसाठी स्थापन झालेल्या मेस्को कंपनीला सुरक्षा रक्षक पुरविण्याचे काम देणे बंधनकारक असल्याचे सांगून स्थानिक सोसायटीकडून हे काम काढून घेण्यात आले. याबाबत तक्रारी झाल्या. तेव्हा येथील अधिकारी उघडे पडले. त्यासाठी टेंडर काढावे लागले. तोपर्यंत स्थानिक सोसायट्या बंद पडल्या. मग दिल्लीतील कंपनीने हे काम घेतले आणि स्थानिक सोसायट्या बंद पडल्या. कॅन्टीन चालविण्याचे काम एक महिला मंडळ चालवत असताना एका प्रकल्पग्रस्ताला काम देण्यात आले. एक एक करून ही कामे काढून घेतल्याने सर्व सोसायट्या हद्दापर झाल्या.www.konkantoday.com




