
नेपाळमधील हिंसाचाराचा पहिला भारतीय बळी, तीर्थयात्रेवरील दाम्पत्य हॉटेलच्या आगीत अडकलं, महिलेचा मृत्यू
नेपाळमध्ये माजलेल्या अराजकामध्ये पहिल्या भारतीयाचा बळी गेला आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील एका जोडप्यासाठी नेपाळमधील धार्मिक यात्रा दुःखद ठरली. 55 वर्षीय राजेशी देवी यांचा हॉटेलला लागलेल्या आगीतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात मृत्यू झाला.58 वर्षीय रामवीर सिंह गोला सपत्नीक काठमांडूमध्ये पशुपतीनाथ मंदिराला दर्शनासाठी गेले होते. सात सप्टेंबरला ते काठमांडूला पोहोचले. नऊ सप्टेंबरच्या रात्री त्यांच्या पंचतारांकित हॉटेलला लावलेल्या आगीत अडकल्याने राजेश देवी यांचा मृत्यू झाला, तर रामवीर किरकोळ जखमी झाले आहेत.
रामवीर सिंह गोला हे व्यवसायाने ट्रान्सपोर्टर आहेत. ते त्यांच्या पत्नीसोबत नेपाळला गेले होते. काठमांडूमध्ये पशुपतीनाथ मंदिराला भेट देणे हा त्यांच्या यात्रेचा उद्देश होता. नऊ सप्टेंबरच्या रात्री त्यांच्या हॉटेलला आग लागली. धूर आणि आगीमुळे लोकांना बाहेर पडणे कठीण झाले. बचाव पथकाने इमारतीच्या खाली गाद्या टाकल्या. लोकांना इमारतीतून उडी मारण्यास सांगितले. रामवीर आणि राजेशी देवी यांनी चौथ्या मजल्यावरून उडी मारली. रामवीर किरकोळ जखमी झाले. पण देवी यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्या मणक्याला मार लागला. त्यांना काठमांडूतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र दहा सप्टेंबरच्या रात्री त्यांचे निधन झाले.




