
त्या बुडालेल्या बोटीवरील बोटीवरील दुसऱ्या बेपत्ता खलाशाचा मृतदेह सापडला
रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा येथील अमिना-आयशा नावाची बोट भगवती किल्ला येथे समुद्राच्या पाण्याच्या लाटेच्या तडाख्याने बुडाली होती. बोटीवरील आठ खलाशी होते. त्यातील ६ जण बचावले होते. मात्र दोन खलाशी समुद्राच्या पाण्यात बेपत्ता झाले. त्यातील एकाचा पांढरा समुद्र येथे मृतदेह सापडला. दुसऱ्या खलाशाचा मृतदेह चार दिवसांनी भगवती किल्ल्याजवळील ब्रेक वॉटर समोरील पाण्यात आढळला.
ही घटना रविवारी (ता. ७) सायंकाळी सातच्या सुमारास घडली होती. अमिना -आयशा ही बोट दुपारी साडेचारच्या सुमारास मिरकरवाडा बंदरातून वायंगणी समुद्राच्या पाण्यात मासेमारीसाठी गेली होती. यामध्ये आठ खलाशी-पागी होते. सर्वजण मिळून वायंगणी समुद्राच्या बाजूने मासेमारी करुन पुन्हा परत मिरकरवाडा जेटी येथे येत असताना, भगवती किल्ला-ब्रेकवॉटर चे टोकावर एका मोठ्या लाटेमुळे उलटली. बोटीवरील आठ खलाशांपैकी ६ जण वाचले होते. तर दोन खलाशी विनोद हिरु धुरी (वय ६३, रा. मांडवी बंदर रोड, रत्नागिरी) व अनामुल इस्लाम तालुकदार (वय २५, रा. सोनापूर, गोराग्राम, राज्य आसाम. सध्या मिरकरवाडा, रत्नागिरी) हे दोघे समुद्राच्या पाण्यात बेपत्ता झाले. पोलिसांकडून खलाशांचा शोध सुरु असताना पागी विनोद धुरी यांच्या मृतदेह पांढरा समुद्र येथे सापडला होता. तर मंगळवारी (ता. ९) चार दिवसाने अनामुल तालुकदार हे भगवती किल्ला येथील ब्रेक वॉटर येथे बेशुद्ध अवस्थेत तरंगताना आढळला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.




