
खेड तालुक्यातील कातळआळी, वाणीपेठ येथे लागलेल्या आगीत दोन मजली कौलारू घराचे मोठे नुकसान
खेड तालुक्यातील कातळआळी, वाणीपेठ येथे आज दिनांक १२ सप्टेंबर २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत दोन मजली कौलारू घराचे मोठे नुकसान झाले. पहाटे अंदाजे ३:१५ वाजता ही घटना घडली.घरमालक श्री. किशोर चंद्रकांत विचारे यांच्या घरातील किचनमधील फ्रिज अचानक शॉर्टसर्किटमुळे जळाल्याने ही आग लागली असल्याची माहिती समोर आली आहे.
आगीची तीव्रता वाढत असताना घरातील तीन भरलेले गॅस सिलेंडर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. विशेष म्हणजे या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र किचनमधील साहित्य जळून खाक झाले असून घराचेही काही प्रमाणात नुकसान झाले आहे. खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.