
अधिकारीच खातायत अधिकाऱ्यांकडून पैसेलाच स्वीकारताना दोन अधिकाऱ्यांसह एक कंत्राटी कर्मचारी जाळ्यात
सामान्य माणूस अनेकदा सरकारी कार्यालयात हेलपाटे घालून थकून जातो त्यामुळे कामे होण्यासाठी अनेकदा अधिकाऱ्यांकडून त्याच्याकडे पैशाची मागणी केली जाते मात्र रत्नागिरीत आता अधिकाऱ्याकडूनच अधिकाऱ्यांनी लाच मागण्याचा प्रकार घडला आहे मात्र ही लाच स्वीकारताना
रत्नागिरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक मोठी कारवाई करत स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयातील वर्ग-१ अधिकाऱ्यासह जिल्हा परिषदेच्या वित्त विभागातील सहाय्यक लेखा अधिकारी आणि एका कंत्राटी शिपायाला रंगेहाथ पकडले लेखापरीक्षण अहवालातील मुद्दे वगळण्यासाठी तब्बल २४,००० रुपयांची मागणी करून, तडजोडीअंती १६,५०० रुपये स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे रत्नागिरीच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
पंचायत समिती, दापोली येथील लेखापरीक्षणातील प्रलंबित मुद्दे निकाली काढण्यासाठी एका सहाय्यक लेखा अधिकाऱ्याकडून १६,५०० रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सायंकाळी उशिरा एकाच वेळी तीन लोकसेवकांना रंगेहाथ अटक केली. यामध्ये स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयाचे सहाय्यक संचालक (वर्ग-१) शरद रघुनाथ जाधव, जिल्हा परिषद वित्त विभागातील सहाय्यक लेखा अधिकारी सिद्धार्थ विजय शेट्ये आणि कंत्राटी शिपाई सतेज शांताराम घवाळी यांचा समावेश आहे.
या प्रकरणातील ५५ वर्षीय तक्रारदार दापोली पंचायत समितीत सहाय्यक लेखा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यालयाचे सन २०२०-२१ आणि २०२१-२२ या आर्थिक वर्षांचे लेखापरीक्षण स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालय, रत्नागिरीमार्फत करण्यात आले होते. या अहवालातील २१ प्रलंबित मुद्द्यांची पूर्तता करून त्यांनी ५ ऑगस्ट २०२५ रोजी अनुपालन अहवाल सादर केला होता.
हा अहवाल अंतिम करून घेण्यासाठी तक्रारदार यांनी ५ ऑगस्ट रोजी सहाय्यक संचालक शरद जाधव आणि कंत्राटी शिपाई सतेज घवाळी यांची भेट घेतली. त्यावेळी, २१ मुद्दे वगळून अंतिम अहवाल देण्यासाठी जाधव यांच्या वतीने घवाळी याने तक्रारदाराकडे २४,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली.
या लाच मागणीविरोधात तक्रारदाराने ११ सप्टेंबर २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. एसीबीच्या पथकाने त्याच दिवशी या मागणीची पडताळणी केली असता, तडजोडीअंती १६,५०० रुपये देण्याचे ठरले.
गुरुवारी सायंकाळी ७ वाजून ४६ मिनिटांनी स्थानिक निधी लेखापरीक्षण कार्यालयात एसीबीने सापळा रचला. यावेळी, सहाय्यक संचालक शरद जाधव यांच्या संमतीने कंत्राटी शिपाई सतेज घवाळी याने तक्रारदाराकडून १६,५०० रुपयांची लाच स्वीकारली आणि ती रक्कम तात्काळ जिल्हा परिषदेचे सहाय्यक लेखा अधिकारी सिद्धार्थ शेट्ये यांच्याकडे सुपूर्द केली. याचवेळी मागावर असलेल्या एसीबीच्या पथकाने तिघांनाही रंगेहाथ पकडले.



