
लोटे येथील कोकाकोला कंपनीत गाड्या अडवून जमावाचा राडा ; 12 जणांवर गुन्हा दाखल
लोटे औद्योगिक वसाहतीतील कोकाकोला कंपनीच्या प्रवेशद्वाराबाहेर बुधवारी दुपारी बेकायदेशीर जमाव करून कंपनीच्या गाड्या जमावाकडून अडविण्यात आल्या, यातील फिर्यादी याला “हातपाय तोडून टाकेन” अशी उघड धमकी देण्यात आली. या प्रकरणी संजय बुरटे (रा. असगणी) याच्यासह 12 जणांविरुद्ध खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात विजयकुमार सुरेंद्र बहादूर सिंग (42, रा. दाभिळ, मूळ गाव उत्तरप्रदेश) यांनी तक्रार नोंदवली. ते घरी जेवत असताना संशयित संजय बुरटेने फोन करून ते कार्यरत असलेल्या कास्ट सोल्यूशन्स ट्रान्सपोर्ट प्रा. लि. या कंपनीच्या गाड्या अडवल्याची माहिती दिली. त्याच्यासोबत आलेल्या जमावाने गाड्यांची कागदपत्रे तपासून ती परत केली.
फिर्यादी घटनास्थळी पोहोचताच संजय बुरटे आणि इतरांनी त्यांना शिवीगाळ केली. यावेळी एका अनोळखी व्यक्तीने पाठीवर हाताने मारहाण करून “पुन्हा इथे आलास तर हातपाय तोडून टाकेन” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.




