
लांजा शहराच्या घनकचरा प्रकल्पावरून नागरिक आणि नगरपंचायत प्रशासनामध्ये खडाजंगी सुरू
लांजा शहराच्या घनकचरा प्रकल्पावरून नागरिक आणि नगरपंचायत प्रशासनामध्ये खडाजंगी सुरू आहे. तीन ठिकाणच्या जागांना विरोध उठल्यानंतर अखेर लांजा नगरपंचायतीकडून शहराचा कचरा तीन किमीवर असणार्या खेरवसे गावात आणून टाकला जात आहे.मात्र आमच्या गावाच्या हद्दीत लांजा शहराचा घन कचरा आणून टाकू नका, असा पवित्रा घेत लांजा न. पं.च्या भूमिकेविरोधात खेरवसे गावच्या नागरिकांसह बेनिखुर्द-खेरवसे ग्रामपंचायतीने कडाडून विरोध केला आहे.
शहरातील घन कचरा खेरवसे गावच्या हद्दी मध्ये टाकू नये अशा आशयाचे एक निवेदन नुकतेच निर्मल ग्रुप ग्रामपंचायत बेनिखुर्द-खेरवसे यांनी लांजा तहसीलदार यांना दिले आहे. त्यामुळे जागेच्या अभावी लांजा शहराचा घन कचरा वादाच्या फेर्यात पुन्हा एकदा अडकण्याची शक्यता आहे. लांजा शहराच्या डँपिंगग्राउंडसाठी नगरपंचायतीकडून सुरुवातीला शहराजवळील धुंदरे गावात जागा निश्चित करण्यात येत असतानाच धुंदरे मधून नागरिकांचा तीव्र विरोध झाला. त्यानंतर लांजा शहरातील कोत्रेवाडी येथे प्रस्तावित जागा करण्यात आली असताना याही जागेला सद्या कडाडून विरोध झाला असून नागरिकांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. तर कुवे येथील जागा निश्चितीबाबत हालचाली सुरू असतानाच स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवल्याने कुवे मधील त्या जागेवर नागरपंचयतीने घन कचरा टाकणे बंद केले आहे.शहराच्या घन कचरा व्यवस्थापनासाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला असतानाच लांजा नगरपंचायतीने शहराचा घन कचरा खेरवसे गावात टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लांजा नगरपंचायतीच्या या मनमानी धोरणाविरोधात बेनिखुर्द-खेरवसे ग्रामपंचायतीने नाराजी।दर्शवत विरोधाची भूमिका घेतली आहे. कचरा टाकण्याबाबत खेरवसे गावच्या ग्रामस्थ व ग्रामपंचायतीला कोणतीच पूर्वसूचना अथवा माहिती न देता लांजा शहराचा घनकचरा खेरवसे गावच्या हद्दीमधील जागेत आणून टाकत आहेत. खेरवसे गावच्या नागरिकांनी लांजा नगरपंचायत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.